भारताने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या यशानंतर माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्राने भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज तसेच या मालिकेत उपकर्णधारपदाची भूमिका बजावत असलेल्या श्रेयस अय्यरचे तोंडभरून कौतुक केले. श्रेयस अय्यर या मालिकेआधी खराब फॉर्ममध्ये होता. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन अर्धशतकांमुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे संकेत मिळत आहेत. श्रेयसने पहिल्या सामन्यात ५७ चेंडूत ५४ धावांची तर, दुसऱ्या सामन्यात त्याने संघासाठी ७१ चेंडूत ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकाही जिंकली.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा यांनी श्रेयस अय्यरचे कौतुक केले. ते म्हणाले, “श्रेयस वनडे क्रिकेटचा मोठा खेळाडू बनत आहे. त्याने फक्त २५ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावावर एक शतक आणि ११ अर्धशतके आहेत. ही मोठी उपलब्धी वाटते. त्याच्या नक्कीच काही कमजोरी आहेत. मात्र, असे असताना देखील तो वनडे क्रिकेटवर राज्य करतोय. हॅमिल्टनमध्ये त्याने मारलेले शतक मला आठवते. सर्व प्रमुख खेळाडू उपलब्ध झाले की, श्रेयसला बाहेर कसे ठेवायचं हा प्रश्न उभा राहणार आहे.”
दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिजकडून विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनी अर्धशतके ठोकत संघाला विजयाकडे नेले. मात्र, संघ अडचणी सापडला असताना अष्टपैलू अक्षर पटेलने अवघ्या ३५ चेंडूवर नाबाद ६४ धावा करत संघाला दोन गडी राखून विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजमध्ये वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यातही भारताने यश मिळवले. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने या वनडे मालिकेत भारताकडून सर्वाधिक ११७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
शेवटच्या षटकावेळी डोक्यात काय चालू होते? मॅच विनर अक्षर पटेलने केला महत्त्वपूर्ण खुलासा
माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”






