मुंबई । माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याला भारताकडून खेळताना दमदार कामगिरी करता आली नाही. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने दहा हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आकाश चोप्रा हा काही सामन्यात सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या सोबत सलामीला खेळला. सध्या तो समालोचक म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्याने दिल्लीच्या रणजी संघाकडून क्रिकेट खेळणे का सोडून दिले याचा खुलासा केला.
आकाश चोप्रा दिल्लीच्या रणजी संघाकडून क्रिकेट खेळत होता, मात्र अचानक एके दिवशी त्याला संघातून काढून टाकण्यात आले. त्यावेळी तो दिल्लीच्या रणजी संघाचा कर्णधार होता. तरीही त्याला पूर्वकल्पना न देता संघातून बाहेर काढण्यात आले.
आकाश चोप्रा आपल्या युट्यूब चॅनलवर वसीम जाफरशी बोलताना म्हणाला की, ” मी दिल्ली ऐवजी राजस्थानकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी संघाचा कर्णधार होतो. मला कोणतीही पूर्वकल्पना न देता संघाबाहेर काढण्यात आले. हे माझ्यासाठी शर्मनाक होते. माझी खूप मोठी बेइज्जत झाली. म्हणून मी दिल्लीऐवजी राजस्थान रणजी संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. ”
आकाशने 10 कसोटी सामन्यात 23.00 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीच्या 162 सामन्यात 45.35 च्या सरासरीने 10839 धावा केल्या. यात 29 शतके आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे.
यावेळी आकाश चोप्राने वसीम जाफरला मुंबईऐवजी विदर्भ कडून क्रिकेट का खेळला असे विचारल्यावर जाफर म्हणाला, “2013-14 च्या हंगामाच्या सुरुवातीला निवड समितीचे एक सदस्य माझ्याकडे आले आणि मला कर्णधार बनवणार असल्याचे सांगितले. 2010 साली कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. 2015 च्या विश्वचषक सुरू होता. बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफी रणजी स्पर्धेच्या आधी भरवले. पुन्हा एकदा निवड समितीचा सदस्य माझ्याकडे आले आणि म्हणाले आम्ही आपल्याला संघातून वगळणार आहोत. मला वाटते या निर्णयात प्रशिक्षकांचे देखील योगदान असावे.”
तो म्हणाला, “या निर्णयाबाबत मी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एक तात्काळ बैठक झाली आणि मला वनडे संघात स्थान देण्यात आले. मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जम्मू काश्मीरविरुद्ध खेळताना मला दुखापत झाली. त्यामुळे मी पूर्ण हंगाम खेळू शकलो नाही. त्यानंतर मी निवड समितीच्या नियोजनात बसत नाही असे मला वाटले. ते मला संघातून काढण्याऐवजी मी स्वतःहून संघाबाहेर गेलेले अति उत्तम असेल असा विचार केला. दरम्यान, विदर्भाच्या संघाकडून मला ऑफर आली होती. संघाच्या भविष्याचा विचार करून मी विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.”