आयपीएल २०२२ च्या होणाऱ्या मेगा लिलावाआधी मागील अनेक वर्षांपासून स्पर्धेचा भाग असणाऱ्या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. ज्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा देखील समावेश आहे. आश्चर्यजनक म्हणजे आरसीबीने फिरकीपटू युजवेंद्र चहलला रिटेन केले नाही. त्यामुळे आरसीबी मेगा लिलावात तशाच एखाद्या खेळाडूच्या शोधात असेल.
ह्यावरूनच माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणाले की, आरसीबी मुंबई इंडियन्सकडून रिटेन न झालेल्या राहुल चहरला संघात समाविष्ट करून घेऊ शकतात. त्यासाठी ते मोठी किंमत देखील मोजू शकतात.
चोप्रा म्हणाले की, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना लेग स्पिनर असणं आवश्यक आहे. चहलने नेहमी इथे खेळताना विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आरसीबीला चहलसारखा एखादा फिरकीपटू संघात हवा असेल.
आपल्या युट्युब चॅनल वर बोलताना ते म्हणाले, आरसीबीला राशिद खान मिळणार नाही, त्यामुळे त्याचा विचार नाही केला तरी चालेल. ह्यामुळे ते राहुल चाहरचा विचार करू शकतात. चिन्नास्वामी स्टेडियमवर लेग स्पिनर्सचा दबदबा आहे. त्यामुळे इतर फिरकीपटू घेऊन उपयोग नसेल.
रवी बिश्नोई देखील एक उत्तम पर्याय आहे. पण माझ्या मते आरसीबी राहुल चाहरवर जास्ती पैसे खर्च करू शकते. मेगा लिलावात चहलला परत जागा मिळणं कठीण आहे.
आकाश चोप्रा म्हणाले की आरसीबीकडे जेसन होल्डर हा कर्णधारपदासाठी एक दावेदार आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यामुळे आरसीबीला कर्णधाराची देखील गरज आहे.
त्यामुळे चोप्राने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरचे नाव घेताना म्हटले, आरसीबीकडे जेसन होल्डरच्या स्वरूपात एक कर्णधार मिळू शकतो. त्यांना अशा खेळाडूची गरज आहे आणि होल्डर ती भूमिका बजावू शकतो. तिकडची खेळपट्टी आणि बाकी सगळ्याचा विचार केला, तर होल्डर एक चांगला पर्याय आहे. होल्डर कुठल्याही संघाकडून खेळताना चांगलं प्रदर्शन करतो.
आरसीबीने विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल या तीन खेळाडूंना संघात कायम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शंभरीतही पुढे आणि शून्यातही…! कसोटीत ‘हा’ अनोखा विक्रम करणारा विराट केवळ दुसराच कर्णधार
“डेविड वॉर्नरला हलक्यात घेण्याची चूक इंग्लंड करणार नाही, हे काही २०१९ साल नाही”
बाद की नाबाद? विराटच्या विकेटने उडवला गोंधळ, पाहा व्हिडिओ