क्रिकेटजगतात आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे ‘मिस्टर 360’ अशी ओळख मिळवलेला क्रिकेटपटू म्हणजे एबी डिविलियर्स. त्याने आजपर्यंत आपल्या फलंदाजीने अनेक दिग्गजांसह चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. पण त्याने 3 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, सध्या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान भारताचे माजी कसोटीपटू आकाश चोप्रा यांनी डिविलियर्सवर एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2021 मध्ये एबी डिविलियर्स पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करीत होता. त्याच्या आधी ग्लेन मॅक्सवेलला फलंदाजीसाठी पाठविण्यात येत होते आणि हा निर्णय आरसीबीला फायद्यात ठरला. आयपीएल 2021 मध्ये दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आरसीबीच्या यशात मोलाची भूमिका बजावली.
आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एबी डिविलियर्सचे कौतुक केले आहे. चोप्रा यांनी डिविलियर्सचे कौतुक केले की पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करूनही त्याच्या कामगिरीत काहीही वाईट फरक पडला नाही.
चोप्रा म्हणाले,” एबी डिविलियर्स एक अलौकिक बुद्धिमत्ता आहे. सर्व लोक म्हणत होते की डिविलियर्सने फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर यावे कारण तो जितके जास्त चेंडू खेळेल तितक्या अधिक धावा करेल. परंतु डिविलियर्सने ठरवले होते की, पाचव्या क्रमांकावर पाठवो अथवा मंगळावर, तो उत्तम फलंदाजी करणार.”
एबी डिविलियर्सने या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी केली. आरसीबी संघाच्या यशात डिविलियर्सचे मोठे योगदान होते. विशेषत: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धची त्याची आक्रमक खेळी ही आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळींमध्ये गणली जाणार आहे. चेन्नई येथे झालेल्या त्या सामन्यात डिविलियर्सने केवळ 34 चेंडूत 76 धावा केल्या होत्या.
आयपीएल 2021 स्पर्धा डिविलियर्स व आरसीबीसाठी उत्तम जात असतानाच स्पर्धेत कोरोनाचे विघ्न पडले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे बायोबबलमध्ये असून देखील खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सदस्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता.
सुरूवातीपासूनच आयपीएल आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह उभे राहत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ही स्पर्धा भारतात आयोजित करणे हे एक मोठे जोखमीचे काम होते. बीसीसीआयने ही जोखीम स्वीकारली मात्र यात त्यांना अपयश आले. आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडूंना आपापल्या मायदेशात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीचे समर्थन करणार्या सलमान बट्टचा टोला मायकेल वॉनला लागला वर्मी, मग चिडून दिला ‘हा’ रिप्लाय
बटलरने निवडली आयपीएलची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, ‘या’ मातब्बर खेळाडूंना दिले स्थान
‘या’ खेळाडूंनी भारताकडून एकही टी२० सामना खेळला नाही, पण आयपीएलमध्ये केले संघाचे नेतृत्व