आयपीएलची 2008 मध्ये सुरुवात झाल्यानंतर ही स्पर्धा इतकी लोकप्रिय होईल अशी कल्पनाही कोणाला नसेल. आयपीएलने युवा खेळाडूंना एक मोठी संधी दिली व अनेकांनी या संधीचे सोने ब. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये केवळ युवा खेळाडूंनीच नाही तर अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंनी देखील सहभाग घेतला. अनेक भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्यांनी आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली. आपण या लेखात बघणार आहोत असे भारतीय खेळाडू ज्यांना आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही मात्र त्यांनी आयपीएल संघाचे नेतृत्व केले.
सौरव गांगुली
सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जातात. दादाने एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. मात्र, त्यांनी भारताकडून टी20 क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र आयपीएलमध्ये ते कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधार होते. आयपीएलच्या पहिल्या व तिसऱ्या सत्रात सौरव केकेआरचे तर 2012 साली पुणे वॉरियर्स संघाचे कर्णधार होते.
अनिल कुंबळे
अनिल कुंबळे यांची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. परंतु त्यांनी भारताकडून एकही टी 20 सामना खेळलेला नाही. तथापि 2009 मध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे कर्णधार होते. 2008 मध्ये देखील ते बंगलोर संघाचे सदस्य होते, परंतु संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर पुढील वर्षी कुंबळेंना कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली, आणि संघाने अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला. पण संघाला अंतिम सामन्यात हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलमध्ये कुंबळेंनी 42 सामन्यांत 45 बळी घेतलेले आहेत.
करुण नायर
आयपीएल 2021 मध्ये करुण नायरने कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. करुणने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात 2013 मध्ये केली होती. त्याने आयपीएलमध्ये 73 सामने खेळलेले आहेत .करुणला 2017 साली दिल्ली डेयरडेविल्स ( आताचे दिल्ली कॅपिटल) संघाच्या कर्णधारपदाची संधीही मिळाली आहे. करुणने देखील भारताकडून एकही टी 20 सामना खेळलेला नाही.
मयंक अग्रवाल
आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या आजारपणामुळे मयंक अग्रवालला संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. 30 वर्षीय मयंक अग्रवालने आयपीएल 2021 मध्ये 7 सामन्यांत 260 धावा केल्या आहेत. मयंकने आतापर्यंत आयपीएलमध्ये 95 सामने खेळलेले आहेत व 1950 धावा केल्या आहेत. मयांक अग्रवालने आयपीएलमध्ये अनेक वेळा आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केली असली तरी त्याला अजूनही भारताकडून टी 20 सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा ‘हा’ गोलंदाज दुखापतीतून सावरला, पुन्हा केली सरावाला सुरुवात
या ५ खेळाडूंना मानले जाते सर्वाधिक आळशी क्रिकेटपटू; २ भारतीयांचाही समावेश






