भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक असलेला आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे अनेकदा चाहत्यांशी चर्चा करताना दिसून येतो. सध्या तो काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आयपीएल २०२० मधील सहभागी संघांची समीक्षा करताना दिसत आहे. नुकताच तो आयपीएल २०२० चा उपविजेता संघ राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची समीक्षा करताना दिसून आला. आकाश चोप्राने दिल्लीचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्यावर टीका करताना, त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
रिषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांच्यावर साधला निशाणा
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने सर्वप्रथम रिषभ पंत व पृथ्वी शॉ यांच्यावर निशाणा साधला. आकाश चोप्रा म्हणाला, “दिल्ली संघाला व चाहत्यांना पंत व शॉकडून भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, ते या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. शॉकडून डावाच्या सुरुवातीला तर पंतकडून डावाच्या अखेरीस फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र त्यांच्यासाठी संपूर्ण हंगाम निराशाजनक गेला.”
पृथ्वीवर सोडले जोरदार टीकास्त्र
आकाश चोप्राने त्यानंतर युवा पृथ्वी शॉ याच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. शॉच्या कामगिरीविषयी बोलताना तो म्हणाला, “पृथ्वीने हंगामाची सुरुवात जोरदार केली. मात्र, तो कामगिरीत सातत्य ठेवू शकला आहे. त्याला अनुभवी अजिंक्य रहाणेच्या जागी संधी मिळाली होती. मात्र, तो ही संधी साधण्यात अपयशी ठरला. तो डावाच्या सुरुवातीलाच बाद होत होता. तो दरवेळी एकसारख्या पद्धतीने बाद होत आहे. आपल्या चुकांमधून शिकण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. आपल्या लवकर बाद होण्याने त्याला जास्त फरक पडत नव्हता. त्याचा हा स्वभाव चुकीचा वाटतो.”
दिल्ली संघ त्याला कराररमुक्त करू शकतो
पृथ्वी आपल्या चुकांमधून शिकला नाही तर त्याचे काय परिणाम होतील, हे सांगताना आकाश चोप्रा म्हणाला, “पृथ्वीने आपल्या खेळात बदल करायला हवा. कामगिरीत सातत्य राखायला हवे. एका युवा खेळाडूकडून सर्वांना सातत्याची अपेक्षा असते. शॉ असाच खेळत राहिला, तर दिल्ली संघ त्याला करारमुक्त देखील करू शकतो.”
शॉसाठी आयपीएल हंगाम राहिला होता निराशाजनक
पृथ्वी शॉने हंगामाच्या सुरुवातीला केकेआरविरूद्ध ६६, तर आरसीबीविरूद्ध ४२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मात्र तो अपयशी ठरला. तो चार सामन्यात भोपळाही फोडू शकला नव्हता. शॉने आयपीएल २०२० मध्ये १३ सामने खेळताना २२८ धावा बनविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय झाली मालामाल, आयपीएलमधून कमावले ‘इतके’ कोटी
आयपीएल २०२१ होणार अधिक रोमांचक, एका संघात खेळणार पाच विदेशी खेळाडू?
आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत