भारताचे दोन संघ सध्या वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ मागील महिन्यापासून इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर नुकताच शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील नवा भारतीय ताफा श्रीलंकेला गेला आहे. १३ जुलैपासून श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेची सुरुवात होणार आहे.
तत्पुर्वी एक नवाच वाद पेटला आहे. यजमान श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी श्रीलंकेला आलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दर्जाचा संघ म्हटल्याने हा वाद निर्माण झाला आहे. आता यावर भारताचे माजी फलंदाज आकाश चोप्रा यांनी तिखट प्रत्युत्तर दिले आहे.
प्रसिद्ध भारतीय समालोचक चोप्रा म्हणाले, “हे खरे आहे की भारताने त्यांचा मुख्य संघ श्रीलंकेला पाठला नाही. जसप्रीत बुमराह, विराट कोहली, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांसारखे केळाडू या संघात नाहीत. परंतु श्रीलंकेला आलेला आमचा दुसरा संघ तुम्हाला ब संघासारखा तरी वाटतोय का?”
“या मालिकेसाठीच्या भारताच्या संभाव्य ११ क्रिकेटपटूंकडे मिळून ४७१ वनडे सामन्यांचा अनुभव आहे. वास्तवात हा आमचा पहिला संघ नाही. तरीही तुम्ही जर तुमचा पहिला संघ निवडला. तर त्या सर्व क्रिकेटपटूंनी मिळून किती वनडे सामने खेळले आहेत? तरीही तुम्हाला आमच्या अनुभवाशी तुमची तुलना करायचीच आहे; तर ही स्पर्धा खूप रोमांचक होणार आहे,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
शेवटी रणतुंगा यांना खडेबोल सुनावत चोप्रा म्हणाले की, “श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आधी स्वत:ची परिस्थिती पाहावी. अगदी अफगानिस्तान संघानेही टी२० विश्वचषकाची पात्रता फेरी गाठली आहे. पण तुमचे काय? श्रीलंकेला येत्या टी२० विश्वचषकात क्वालिफाय होण्यासाठी पात्रता फेरी सामने खेळावे लागणार आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर, सत्य हे आहे की, श्रीलंकेचा वरिष्ठ संघ सध्या वाईट काळातून जात आहे. त्यांचे आताचे इंग्लंडमधील आकडेच पाहा, मग तुम्हाला सत्याची जाणीव होईल.”
काय म्हणाले होते अर्जुन रणतुंगा?
रणतुंगा यांनी म्हटले होते की, “हा दुसऱ्या श्रेणीचा भारतीय संघ आहे आणि त्यांचे इथे येणे आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टेलिव्हिजन मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत खेळण्याचे मान्य केल्याबद्दल मी सध्याच्या प्रशासनाला दोष देतो.”
तसेच ते म्हणाले होते की, “भारताने आपला बलाढ्य संघ इंग्लंडला रवाना केला आहे. तर कमकुवत संघ इथे पाठवला आहे. मी यासाठी बोर्डाला दोषी ठरवतो.” या भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तर उप कर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एक बार परदा हटा दे शराबी’ गाण्यावर थिरकली शमीची मुलगी; सहकारी म्हणाला, ‘शानदार बेबो’
Video: पंचांकडून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर अन्याय? डिविलियर्स अन् स्टेनही चकित
अस्सल गिफ्ट! भज्जीला ४१व्या वाढदिवशी मिळाली ‘खास’ भेट; पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ