ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघ जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बराच बदल दिसून येईल. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून खेळला जाईल. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होणे नक्की आहे. विराट कोहली व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर पडले आहेत. तसेच, मयंक अगरवालसोबत एक नवा सलामीवीर संघात सामील केला जाऊ शकतो. समालोचक आकाश चोप्रा याने या दुसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी अनुभवी खेळाडूचा पर्याय सुचवला आहे.
बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघासाठी सलामीची जोडी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. पृथ्वी शॉ धावा काढण्यासाठी झगडतोय. त्यामुळे, कदाचित शुभमन गिल किंवा केएल राहुल यांना पृथ्वीच्या जागी डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे, दुसऱ्या सामन्यात मयंक अगरवालला नवीन साथीदार लाभणार आहे.
राहुल असावा मयंकचा साथीदार
माजी भारतीय कसोटीपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनलवरून मयंक अगरवालसोबत सलामीला उतरु शकणाऱ्या, दुसऱ्या खेळाडूविषयी सांगितले. तो म्हणाला की,
“पृथ्वी शॉला दुसर्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल असे वाटत नाही. या क्षणी त्याचा आत्मविश्वास खूप कमी आहे. भविष्यात त्याला संघामध्ये पुनरागमन करण्याच्या अनेक संधी मिळतील. मात्र दुसऱ्या कसोटीसाठी मयंक अगरवालसोबत सलामीवीर म्हणून अनुभवी केएल राहुलला संधी देण्यात यावी. तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. शुबमन गिल हा देखील चांगला पर्याय वाटतो. परंतु, तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्मा संघात आल्यास गिलवर संघातून वगळले जाण्याची टांगती तलवार असेल. त्यामुळे गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले जावे.”
भारतीय संघासमोर निर्माण झाल्या आहेत समस्या
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. युवा खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाला पूर्णपणे निराश केलेले दिसून येते. त्यामुळे मालिकेतील राहिलेल्या तीन सामन्यात नवा कर्णधार अजिंक्य रहाणे पुढे बरीच आव्हाने असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
ती म्हणाली, ‘फुलं मला आनंद देतात’ आणि केएल राहुलने थेट…
IND vs AUS: मेलबर्न येथे होणारा कसोटी सामना ‘या’ कारणामुळे ठरणार खास
ट्रेंडिंग लेख –
यावर्षी फक्त तुमचीच हवा! आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज
वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच