मुंबई । भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे आपल्या स्वभावाप्रमाणे आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. उंच उंच षटकार मारण्यात माहीर होते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तर जीव तोडून खेळताना दिसून यायचे. याच दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आमिर सोहेल यांनी भारत-पाक सामन्यात झालेल्या सिद्धू विषयीचा किस्सा शेअर केला.
सोहेल (Aamer Sohail) एका यूट्यूब चॅनल शी बोलताना म्हणाले, “नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) कोण आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे. ते क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव आहे. ते त्या फलंदाजापैकी आहेत, ज्यांचा मी आदर करतो. जगातल्या दिग्गज गोलंदाजांना फोडून काढत काही महत्त्वपूर्ण खेळी केल्या.”
सोहेल यांनी 1995 साली घडलेला किस्सा सांगताना म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात शारजाह येथे सामना सुरू होता. त्या सामन्यात मी पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत होतो. सिद्धू 90 धावांवर खेळत होते. षटक सुरू असताना ते रागाने माझ्याजवळ आले आणि म्हणाले, या वेगवान गोलंदाजांना समजावून सांग. ते चुकीचे करत आहे. मी म्हणालो, काय झाले पाजी? सिद्धू म्हणाले, तुमच्या वेगवान गोलंदाजांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले. त्यांना काय पाहिजे ते सांगावे, पण त्यांनी अपशब्द वापरू नये.”
“ते वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना बडबड करण्याची सवय आहे. आपण दुर्लक्ष करावे. सामना संपल्यावर आपण बोलू,” असे सिद्धूंबद्दल बोलताना सोहेल पुढे म्हणाले.