न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (५ मार्च) वेलिंग्टनमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड संघावर ५० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाने मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे. सामन्यात ताबडतोड ७९ धावा करत अॅरॉन फिंच या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तसेच त्याने या सामन्यात एका खास विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.
मागील सामन्यात ६९ धावांची खेळी केल्यानंतर या सामन्यात देखील अॅरॉन फिंचने ७९ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. या सामन्यात त्याने ४ लांबच लांब षटकार मारले. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १०० षटकार लगावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. त्याने ७० टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण १०३ षटकार लगावले आहेत.
तसेच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टील आहे. गप्टीलने आतापर्यंत १३५ वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवला आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
१) मार्टिन गप्टील – १३५ षटकार, न्यूझीलंड
२) रोहित शर्मा – १२७ षटकार, भारत
३) ओएन मोर्गन – ११३ षटकार, इंग्लंड
४) कॉलिन मुन्रो – १०७ षटकार, न्यूझीलंड
५) ख्रिस गेल – १०५ षटकार, वेस्ट इंडिज
६) अॅरॉन फिंच – १०३ षटकार, ऑस्ट्रेलिया
७) ग्लेन मॅक्सवेल – ९३ षटकार, ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियन संघाने ५० धावांनी मिळवला विजय
चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकाअखेर ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. यात अॅरॉन फिंचने सर्वाधिक ५५ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. मागच्या सामन्यात ताबडतोड खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल अवघ्या १८ धावा करत माघारी परतला.
न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना इश सोढीने सर्वाधिक ३ गडी बाद केले तर ट्रेंट बोल्टने २ आणि मिशेल सँटनरने १ गडी बाद केला. १५७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांना अपयश आले. न्यूझीलंड संघ २० षटकांच्या समाप्तीनंतर सर्वबाद १०६ धावा करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! अनेक भारतीय धावपटूंच्या यशात मोलाचे योगदान देणारे प्रशिक्षक वसतिगृहात आढळले मृतावस्थेत