टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली होती, पण तरीही ऑस्ट्रेलियाने त्यांना पाच विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तानसाठी पहिल्या तीन फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली, यामध्ये मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ६७ धावा केल्या. रिजवानने ही उत्कृष्ट खेळी करून सर्वाचे लक्ष तर वेधले, पण सामन्यादरम्यान अजून एका कारणास्तर तो चर्चेत आला होता.
वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने रिजवान फलंदाजी करत असताना एक खतकनाक बाउंसर टाकला, जो त्याच्या हेल्मेटवर जाऊन लागला. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने त्याची विचारपूस केली होती. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या १३ व्या षटकात घडली. या षटकात मिशेल स्टार्क गोलंदाजी करत होता आणि स्ट्राइकवर सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान होता. स्ट्रार्कने टाकलेला एक चेंडू वेगात आला आणि रिजवानच्या हेल्मेटवर जाऊन लागला. सुदैवाने स्टार्कने टाकलेला हा चेेंडू रिजवानच्या हेल्मेटच्या आतमध्ये जाऊ शकला नाही. या घटनेनंतर सामना थोड्या वेळासाठी थांबवण्यात आला होता. यानंतर रिजवानची तपासणी करण्यात आली आणि जेव्हा हे स्पष्ट झाले की, काही गंभीर दुखापत झालेली नाही, त्यानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात करण्यात आली.
स्टार्कने टाकलेला चेंडू जेव्हा रिजवानच्या हेल्मेटला जाऊन लागला, तत्काळ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच त्याच्याकडे गेला आणि त्याची विचारपूस केली केली. फिंचने या कृतीमुळे चाहत्याची मने जिंकली आहेत. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
फिंच जवळ आल्यानंतर रिजवानही आनंदी झालेला दिसला. फिंचला जवळ येताना पाहून तो मनमोकळेपणाने हासताना दिसला. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले की, ‘बाउंसर लागल्यानंतर फिंच त्याची विचारपूस करत आहे, स्पिरिट ऑफ क्रिकेट.’
https://www.instagram.com/p/CWI-KmZlc9w/
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांचे सलामीवीर मोहम्मद रिजवानने ५२ चेंडूत ६७ आणि बाबर आजमने ३४ चेंडूत ३९ धावा केल्या. याव्यतिरिक्त फाकर झमानने ३२ चेंडूत ५५ धावा केल्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १७७ धावांचे लक्ष्य १९ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. मार्कस स्टॉयनिसने ३१ चेंडूत ४० आणि मेथ्यू वेडने १७ चेंडूत ४१ धावांची महत्वाची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. याव्यतिरिक्त सलामीवीर डेविड वार्नरने ३० चेंडूत ४९ धावांचे महत्वाचे योगदान दिले. तसेच मिशेल स्टार्कने ३८ धावा देऊन दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
दे घुमा के! डेविड वॉर्नरने दोन टप्पे पडून आलेल्या चेंडूवर ठोकला षटकार, पाहा व्हिडिओ
पराभव पचेना! पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल हारला आणि दु:खात चाहता दुबईच्या मैदानातच झोपला
फखर जमानच्या ‘बुलेट’ शॉटपासून थोडक्यात वाचले पंच, नाहीतर घडली असती दुर्घटना; बघा थरारक व्हिडिओ