आयसीसी टी२० विश्वचषकात शनिवारी (३० ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघातील सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य इंग्लंडने आठ विकेट्स राखून गाठले. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार ऍरॉन फिंचने सर्वाधित ४४ धावा केल्या, पण तरीदेखील संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
फिंचने या ४४ धावा चार चौकारांच्या मदतीने आणि ४९ चेंडूंमध्ये केल्या आहेत. याचसोबत फिंचने या सामन्यात केलेल्या धावसंखेच्या जोरावर तो इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर होता. शनिवारी पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या सामन्यांनतर तो आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने विराटला या यादीत मागे टाकले आहे आणि तो पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
फिंचने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध १३ टी२० सामन्यांत ५९.४० च्या सरासरीने ५९४ धावा केल्या आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीने १७ टी२० सामन्यांत ४४.३८ च्या सरासरीने ५७७ धावा केल्या आहेत. या दोघांनाच इंग्लंडविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत.
याव्यतिरिक्त इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक टी२० धावा करणाऱ्यांमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गप्टिलने इंग्लंडविरुद्ध ४६७ धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा दमदार खेळाडू ख्रिस गेल आहे. गेलने टी-२० मध्ये इंग्लंविरुद्ध ४२२ धावा केल्या आहेत. एबी डिविलियर्स या यादीत पाचव्या स्थानावर आहे, त्याने इंग्लंडविरुद्ध ३९० धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पराभव
शनिवारी सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाने २० षटकांमध्ये सर्वबाद होऊन १२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य सहज गाठले. इंग्लंडने आठ विकेट्स आणि ५० चेंडू शिल्लक ठवून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.
इंग्लंडच्या जॉस बटरलने ३२ चेंडूत सर्वाधिक ७१ धावांची महत्वाची आणि नाबाद केली. याव्यतिरिक्त इंग्लंडचा गोलंदाज क्रिस जॉर्डनने त्याच्या चार षटकांमध्ये अवघ्या १७ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवायचा असल्यास ‘हे’ तीन निर्णय टीम इंडियासाठी ठरू शकतात फायदेशीर
टी२० विश्वचषक: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने एकतर्फी विजय