इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील क्रिकेटपटू सहभाग घेत असतात. या स्पर्धेत असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी एकापेक्षा अधिक संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काही खेळाडू असेही आहेत, ज्यांनी ३ किंवा ४ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु एक असाही खेळाडू आहे, ज्याने आयपीएल स्पर्धेत चक्क ८ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यात ऑस्ट्रेलियन संघाचा विस्फोटक फलंदाज आरोन फिंचच्या नावे देखील आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद आहे. फिंचने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा इतिहासात एक, दोन नव्हे तर तब्बल ८ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. इतकेच नव्हे तर त्याने एका संघाचे नेतृत्व देखील केले आहे. असा कारनामा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. फिंचनंतर श्रीलंकेच्या थिसारा परेराने आयपीएल स्पर्धेत ६ संघांचे प्रतिनिधित्व करण्याचा कारनामा केला आहे.
फिंचने या संघांचे केले आहे प्रतिनिधित्व
आरोन फिंचने २०१० मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर पुढील दोन वर्षे त्याने दिल्ली डेअरडेवील्स संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्याला पुणे वॉरियर्स इंडिया संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. त्यावेळी त्याला पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तसेच २०१४ मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
तर २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स तर २०१६ आणि २०१७ मध्ये त्याला गुजरात लायन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच २०१८ मध्ये त्याला किंग्स इलेव्हन पंजाब संघात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला २०२० मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्याची संधी मिळाली.
आरोन फिंचने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ८७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला २५.७० च्या सरासरीने २००५ धावा करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याने १४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना १२ सामन्यात २२.३३ च्या सरासरीने २६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात त्याच्यावर कुठल्याही संघाने बोली लावली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटरचा सल्ला ऐकून थालाचे चाहते नक्कीच संतापतील! म्हणाले, ‘धोनीच्या आधी…’
यंदाची आयपीएल ट्रॉफी ‘या’ संघाचीच; मुंबई-चेन्नईतील महामुकाबल्याआधी ‘विरू बाबां’ची भविष्यवाणी