इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता. या संघातील मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या एबी डिविलियर्सकडून मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा होती. परंतु, तो एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. ज्यामुळे त्याच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फसला होता. कारण या संघातील मुख्य फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी परतले होते. त्यानंतर ५ व्या क्रमांकावर एबी डिविलियर्स फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता.
परंतु, आंद्रे रसलने अप्रतिम यॉर्कर चेंडू टाकला जो जाऊन यष्टीला धडकला आणि एबी डिविलियर्स पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला होता. यासह तो आयपीएल स्पर्धेत दहाव्यांदा भोपळा ही न फोडता माघारी परतला आहे.
एबी डीविलियर्स आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत एकूण १७६ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ४०.८ च्या सरासरीने ५०२६ धावा केल्या आहेत. यामध्ये ४० अर्धशतक आणि ३ शतकांचा समावेश आहे. १७६ सामन्यांमध्ये तो १० वेळेस भोपळा ही न फोडता माघारी परतला आहे. यामध्ये ८ वेळेस तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना बाद झाला आहे, तर २ वेळेस तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठी खेळताना ० धावांवर बाद झाला होता.
दरम्यान ६ वेळेस तो गोल्डन डकवर म्हणजेच पहिलाच चेंडू खेळताना शून्यावर, २ वेळेस डावातील दुसऱ्या चेंडूवर, तर एक वेळेस तो तिसऱ्या चेंडूवर आणि एक वेळेस तो डावातील सातव्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता.
या गोलंदाजांनी डिविलियर्सला गोल्डन डक वर केले आहे बाद
एबी डिविलियर्स हा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो कुठल्याही चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याला बाद करणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्नं असते. एबी डिविलियर्सला आयपीएलमध्ये ॲल्बी माॅर्कलने २००८ मध्ये गोल्डन डकवर बाद केले होते. तर सुदीप त्यागीने २००९, जॅक कॅलिसने २०१२, केन रिचर्डसनने २०१४, मोझेस हेन्रिक्सने २०१५ मध्ये आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आंद्रे रसलने एबी डिविलियर्सला गोल्डन डक वर बाद केले आहे.
महत्त्वात्या बातम्या –
बापरे!! ‘इतक्या’ कोटींना विकली जाणार विराट कोहलीची ‘सुपर कार’; किंमत वाचून व्हाल चकीत
विराटची बात काही औरच!! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला एकमेव खेळाडू
कोहली अन् केकेआर @२००! बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना सुरु होताच झाले २ मोठे विक्रम