काल (२० फेब्रुवारी) भारतीय संघाच्या निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात ३० वर्षीय सूर्यकुमार यादवला स्थान मिळवण्यात यश आले. तब्बल १२ वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच आयपीएल मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याची भारतीय संघात निवड होत नव्हती.
मात्र अखेर काल त्याची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. सूर्यकुमारला पहिल्यांदाच कुठल्याही फॉरमॅटमधील भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र त्याची निवड झाल्यानंतर सोशल मिडीयावर एक वेगळीच गोष्ट व्हायरल होते आहे. भारतीय संघाचे विद्यमान निवडकर्ता अॅबी कुरुविला यांची एक जुनी कमेंट सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड न झाल्यावर केले होते ट्विट
मागील वर्षी आयपीएलचा हंगाम चालू असताना सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खोऱ्याने धावा काढत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात त्याची निवड होणारच, अशी अटकळ बांधली होती. मात्र धक्कादायक रित्या त्याला या संघात स्थान मिळाले नव्हते. यानंतर भारताच्या निवड समितीवर अनेकांनी टीकाही केली होती.
त्यावेळी अॅबी कुरुविला यांनी एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी “सूर्यकुमारचीही वेळ येईल”, असे म्हंटले होते. म्हणजेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमारला स्थान मिळाले नसले, तरी हे सतत होणार नाही. एक ना एक दिवस त्याला संधी नक्कीच मिळेल, असा त्यांच्या ट्विटचा आशय होता. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाल्याने काही महिन्यांच्या अंतरानेच त्यांचे हे भाकीत खरे ठरले आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा आहे.
सूर्यकुमारची क्रिकेट कारकिर्द –
सूर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत. तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १७० सामन्यात ३१.५६ च्या सरासरीने ३५६७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने ३०.२० च्या सरासरीने २०२४ धावा केल्या आहेत. गेले तीन हंगाम तो मुंबई इंडियन्सच्या संघाचा अविभाज्य घटक आहे.
महत्वाच्या बातम्या:
जड्डूच्या एका सल्ल्याने बदलले टेम्पो चालकाच्या मुलाचे आयुष्य, आता गाजवणार आयपीएलचं मैदान
सनरायझर्स हैद्राबादच्या खेळाडूच्या घरी चिमुकल्याचे आगमन, ट्विट करत शेअर केली आनंदाची बातमी
आयपीएल लिलावात मिळाला नाही भाव, पठ्ठ्याने सेंचूरी मारत फलंदाजीत दाखवला ताव; बघा कोण आहे तो?