भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. हा दौरा छोटेखानी असला तरी या दौऱ्यावर आपला मजबूत संघ बीसीसीआयने पाठवला होता. मात्र, वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताला गमवावे लागले. असे असतानाच खेळाडूंच्या दुखापतींनी देखील बीसीसीआय व संघ व्यवस्थापन त्रस्त आहे. कर्णधार रोहित शर्मा हा दुखापतीमुळे मायदेशी परतला असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून बांगलादेश दौऱ्यावर इंडिया ए संघाचे नेतृत्व करत असलेल्या, अभिन्यू ईस्वरन याला संघात समाविष्ट केले गेले आहे.
दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्मा याला बोटाला दुखापत झालेली. क्षेत्ररक्षणातून बाहेर झाल्यानंतर फलंदाजी संघाला गरज असल्याने तो फलंदाजीला उतरलेला. मात्र, या सामन्यानंतर तो उपचार घेण्यासाठी थेट मुंबईला परतला. तो तिसऱ्या वनडेतून बाहेर झाला आहे. तो कसोटी मालिकेत खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट बातमी समोर आलेली नाही.
रोहित कसोटी मालिकेत खेळणार का हे माहीत नसल्याने, खबरदारी म्हणून सध्या बांगलादेशमध्ये असलेला इंडिया ए संघाचा कर्णधार अभिमन्यू ईस्वरन हा संघात सामील झाला आहे. अभिमन्यू हा बांगलादेश ए विरुद्धच्या दोन्ही चार दिवसीय सामन्यांमध्ये यशस्वी ठरला होता. त्याने पहिल्या सामन्यात 141 व दुसऱ्या सामन्यात 157 धावांची खेळी केलेली. तर, बांगलादेशला रवाना होण्यापूर्वी बंगालसाठी खेळताना त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकावलेले. अभिमन्यू हा मागील अनेक वर्षांपासून बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढत आहे.
भारतीय संघासाठी बांगलादेश विरुद्धची ही मालिका अत्यंत महत्त्वाचे आहे. मालिकेतील हे दोन्ही सामने जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे भारतीय संघ आगेकूच करू शकतो.
(Abhimanyu Easwaran Included In India Sqaud For Bangladesh Series)






