भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा टी२० बुधवारी (२८ जानेवारी) खेळला गेला. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ५० धावांनी पराभूत केले. भारताच्या या पराभवाचे कारण चाहत्यांनी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आवडत्या खेळाडूला ठरवले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध ही टी२० मालिका भारताने जिंकली असली तरी चौथ्या सामन्यात यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये शिवम दुबेने त्याच्या स्फोटक फलंदाजीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अपयशी ठरला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने अधिक धावा तर दिल्याच मात्र त्याच्यामुळे शिवमही धावबाद झाल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये आहेत.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात विकेट्स गमावत २१५ धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. ज्यामध्ये गोलंदाजीत हर्षितला चांगलेच धुतले गेले. त्याने या सामन्यात ४ षटकात एकही विकेट न घेता ५४ धावा दिल्या. यामध्ये त्याने २० धावा जरी कमी दिल्या असत्या तर भारताने न्यूझीलंडला २००च्या आत रोकले असते. त्याच्या या खराब कामगिरीने तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
मागील काही सामन्यात हर्षितने उत्तम गोलंदाजी केली होती, ज्याचा संघाला फायदा झाला होता. मात्र चौथ्या टी२०मध्ये तसे काही घडले नाही. या सामन्यात त्याने फलंदाजीतही निराशा केली. त्याने १३ चेंडूत केवळ ९ धावा केल्या.
भारताने या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ५ विकेट्स १०.३ षटकात ८२ धावसंख्येवरच गमावल्या होत्या.
त्यानंतर शिवमने १५ चेंडूतच अर्धशतक केले ज्यामुळे संघाला आणि चाहत्यांना थोडा धीर आला होता. असे होत असतानाच १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षितने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर एक शॉट खेळला, जो गोलंदाजाच्या हाताला लागून नॉन-स्ट्राईकच्या स्टम्पला लागला. त्यावेळी शिवम क्रिजच्या बाहेर होता आणि त्याला धावबाद दिले गेले. या सामन्यात त्याने २३ चेंडूत ६५ धावांची महत्वाची खेळी केली. त्याच्या या धावबादलाही हर्षितलाच कारणीभूत ठरवले जात आहे.






