सध्या दुलीप ट्रॉफी 2024 ची दुसरी फेरी खेळली जात आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या अनेक स्टार खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली.
दुलीप ट्रॉफीत असे अनेक खेळाडू खेळत आहेत, जे भारतीय संघात संधीची वाट पाहतायेत. यातीलच एक खेळाडू म्हणजे पश्चिम बंगालचा अभिमन्यू ईश्वरन. तो दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाचा कर्णधार आहे. ईश्वरननं दुसऱ्या फेरीतील सामन्यात इंडिया सी विरुद्ध शानदार शतक झळकावलं. यासह भारतीय संघातील जागेसाठी त्यानं आपला दावा ठोकला आहे.
हा उजव्या हाताचा सलामीवीर इंडिया ए विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. तो दोन्ही डावात मिळून केवळ 17 धावाच करू शकला. मात्र इंडिया सी विरुद्धच्या सामन्यात त्यानं शानदार पुनरागमन केलं. इंडिया सी नं पहिल्या डावात 525 धावांचं डोंगर उभा केला आहे. अभिमन्यू ईश्वरननं या धावसंख्येला जोरदार उत्तर देत इंडिया बी साठी सलामीला शतक ठोकलं. चहापानापर्यंत त्यानं 186 चेंडूत 108 धावा ठोकल्या होत्या. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.
भारताच्या कसोटी संघात गेल्या काही काळापासून यशस्वी जयस्वाल रोहित शर्मासोबत ओपनिंगला येतोय. तर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येत असून केएल राहुल मधल्या फळीत खेळतोय. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताला बॅकअप ओपनरची आवश्यकता भासेल. अभिमन्यू ईश्वरन ही भूमिका उत्तमपणे निभावू शकतो.
ईश्वरन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात ऋतुराज गायकवाडचा बॅकअप म्हणून गेला होता. मात्र तेव्हा त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. ईश्वरननं प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 95 सामन्यांत 7023 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यानं 23 शतकं आणि 29 अर्धशतकं झळकावली.
हेही वाचा –
गोलंदाजी प्रशिक्षक बनल्याची बातमी मिळताच मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया काय होती?, भारतीय संघात येताच केला मोठा खुलासा
कपिल शर्माच्या शोमध्ये रोहितसह दिसणार भारताचे हे वर्ल्डकप विजेते स्टार्स! प्रोमो व्हिडिओ लॉन्च
“श्रेयस अय्यर स्वतःला कोहली समजतोय, त्याची पातळी…”, माजी क्रिकेटपटूनं वाभाडे काढले