सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मानं नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2024 मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती. या डावखुऱ्या फलंदाजानं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. आयपीएलच्या या हंगामात अभिषेक शर्मानं अनेक तुफानी खेळी खेळल्या. आता आयपीएल संपल्यानंतरही पुन्हा एकदा त्याचं वादळ पाहायला मिळालं आहे.
वास्तविक, अभिषेक शर्मानं अवघ्या 25 चेंडूत शतक झळकावून विक्रम केला आहे. त्यानं शेर-ए-पंजाब टी20 सामन्यात अवघ्या 25 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. त्यानं आपल्या खेळीत 4 चौकार आणि तब्बल 14 षटकार लगावले.
आयपीएल 2024 मध्ये अभिषेक शर्मानं उत्कृष्ट फलंदाजी केली होती. सनरायझर्स हैदराबादसाठी त्यानं ट्रॅव्हिस हेडसह सलामीला येत संघाला जवळजवळ प्रत्येक सामन्यात झंझावाती सुरुवात करून दिली होती. आयपीएलच्या या हंगामात अभिषेक शर्मानं 13 सामन्यात 350 च्या स्ट्राईक रेटनं 467 धावा केल्या. मात्र, या चमकदार कामगिरीनंतरही अभिषेक शर्माच्या हाती निराश आली. तो टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. मात्र आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या फलंदाजीनं पुन्हा एकदा कहर केला आहे.
अभिषेक शर्माच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, या 23 वर्षीय डावखुऱ्या सलामीवीरानं आयपीएलमध्ये 63 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं एक फलंदाज म्हणून 155.13 चा स्ट्राइक रेट आणि 25.48 च्या सरासरीनं 1376 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये 7 अर्धशतकं आहेत. फलंदाजीसह तो पार्टटाईम फिरकी गोलंदाजीही करतो. आयपीएलमध्ये त्यानं 11 बळी घेतले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त अभिषेक आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा देखील भाग होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो पंजाबचं प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ॲडम झम्पाचा कहर, ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा दम काढला; गतविजेत्यांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका
डेव्हिड मिलरनं दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा होणार होता मोठा अपसेट
श्रीलंकेचा पराभव होऊनही वानिंदू हसरंगानं रचला इतिहास, लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडला