भारतीय वरिष्ठ पुरुष संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात टी २० मालिकेने झाली आहे. पाच सामन्याच्या या मालिकेचा भाग असणाऱ्या भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्याबद्दलच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
याप्रकरणात अभिषेकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने, अद्याप न हटवलेल्या URLs चा तपशील देणारे एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी सांगितले की, अभिषेक शर्माच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्या त्याच्या खटल्यात अंतरिम आदेश जारी करतील.
संपूर्ण प्रकरण
अभिषेकच्या वकिलाने सांगितले की, आक्षेपार्ह काही पोस्ट आधीच काढण्यात आल्या असल्या तरी, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील काही पोस्ट अशा आहेत, ज्यामध्ये अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे आणि त्या डिलीट केलेल्या नाहीत. तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन अभिषेक शर्मा याचा फोटो त्याच्या परवानगीशिवाय व्यावसायिक कारणांसाठी वापरला आहे, जो काढला पाहिजे.
याबद्दल मेटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, दोन्ही सोशल मीडिया पोस्ट काढल्या जातील. ॲमेझॉनच्या वकिलाने स्पष्ट केले की, ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील आणि अभिषेकच्या परवानगीशिवाय वापरणाऱ्या URLs काढून टाकतील.
इंग्लंड दौरा
सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत अभिषेकने संघाला चांगली सुरूवात करून दिली, मात्र तो मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने पहिल्या टी २० मध्ये २४ चेंडूंत ५९ धावा आणि दुसऱ्या टी २० मध्ये २४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तर तिसऱ्या टी २० मध्ये ७ चेंडूंत एका षटकाराच्या सहाय्याने १० धावा करत बाद झाला
पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत ०-२ असा मागे आहे आणि आज (९ जुलै) चौथा सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे मालिका अनिर्णीत राखण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामध्ये अभिषेक कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असणार आहे. (Abhishek Sharma moves the Delhi High Court for Personality rights)






