भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात अभिषेक शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या 7 षटकारांसह, अभिषेकने टी20 क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा ओलांडला आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 400 षटकार पूर्ण करण्याचा विक्रम अभिषेकने आपल्या नावावर केला आहे. या यादीत त्याने ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकले. मात्र, अभिषेकला अव्वल स्थान मिळवता आले नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात अभिषेकने 28 चेंडूंत 61 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 218 इतका होता.
टी20 क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी अभिषेक शर्माला 3513 चेंडू लागले, तर ख्रिस गेलला आपल्या कारकिर्दीत ही कामगिरी करण्यासाठी 3557 चेंडू लागले होते. परिणामी, गेल तिसऱ्या स्थानावर घसरला आहे, तर अभिषेक दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 400 षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेलच्या नावावर आहे. रसेलने अवघ्या 3027 चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. अभिषेक आणि रसेल यांच्यात जवळपास 500 चेंडूंचा फरक आहे. या यादीत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांचे वर्चस्व आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडचाही समावेश आहे.
टी20 मध्ये 400 षटकार ठोकण्यासाठी लागलेले सर्वात कमी चेंडू
3027 – आंद्रे रसेल
3513- अभिषेक शर्मा
3557 – ख्रिस गेल
3803 – टिम डेव्हिड
3944 – कायरन पोलार्ड
4045 – निकोलस पूरन
4072 – एव्हिन लुईस
अभिषेक शर्माने 2026या कॅलेंडर वर्षात 100 षटकार ठोकण्याचा टप्पाही गाठला आहे. ही कामगिरी करण्यासाठी त्याला 651 चेंडू लागले. एका कॅलेंडर वर्षात सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 टी20 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीतही आंद्रे रसेल अव्वल स्थानावर आहे; त्याने 2019 मध्ये 100 षटकार ठोकण्यासाठी 579 चेंडू घेतले होते.






