आयपीएल 2024 चा 18 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची टीम निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 165 धावाच करू शकली.
166 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात धमाकेदार झाली. सनरायझर्सचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मानं क्रिजवर येताच चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. तो पहिल्या चेंडूपासून आक्रमणाच्या मोड मध्ये होता.
हैदराबादसाठी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड सलामीला आले. अभिषेक शर्मानं डावातील पहिल्या षटकातील तिसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. हे षटक दीपक चहरनं टाकलं होतं. यानंतर तो येथेच थांबला नाही. त्यानं सतत चौकार आणि षटकार मारणं जारी ठेवलं. अभिषेकनं अवघ्या 12 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं 37 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 300 च्या वर राहिला. त्याच्या या खेळीनं हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली.
अभिषेक शर्मा आयपीएलच्या या हंगामात तुफानी फलंदाजी करतोय. संघानं त्याला सलामीला पाठवत मोकळेपणानं फटकेबाजी करण्याची मुभा दिली आहे. या नव्या भूमिकेमुळे अभिषेकच्या फलंदाजीतही बहार आला आहे. आयपीएलच्या आधीच्या हंगामांमध्ये अभिषेक खालच्या फळीत फलंदाजीला यायचा. त्यामुळे त्याला अखेरच्या काही षटकांमध्येच फलंदाजीची संधी मिळायची. मात्र या हंगामात तो डावाला सुरुवात करू लागल्यानं त्याच्यावर धावा काढण्याचा कुठलाही दबाव नाही. यामुळे तो खुलून फलंदाजी करतोय.
अभिषेक शर्माच्या आयपीएल कारकिर्दीलर नजर टाकली तर, त्यानं 51 सामन्यांच्या 49 डावांमध्ये 1053 रन केले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 24.49 आणि स्ट्राईक रेट 145.44 आहे. त्याच्या नावे आयपीएलमध्ये 5 अर्धशतकं असून, 75 धावा ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या दुखापती थांबेना! आता चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर
दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणींमध्ये वाढ; कुलदीप यादवची दुखापत गंभीर, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला