झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्मानं स्फोटक कामगिरी करत भारतासाठी शतक झळकावलं. अभिषेकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा दुसराच टी20 सामना आहे. हरारेमध्ये त्यानं आपल्या स्फोटक खेळीनं अनेक विक्रम मोडीत काढले.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला. भारताकडून अभिषेक शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल सलामीला आले. गिल अवघ्या 2 धावा करून बाद झाला. पण अभिषेकनं दुसऱ्या टोकावरून कहर केला. त्यानं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चांगलच फोडून काढलं. अभिषेकनं 47 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 7 चौकार आणि 8 षटकार मारले.
अभिषेक शर्मानं आपल्या टी20 कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावण्यासाठी सर्वात कमी सामने खेळले. या बाबतीत त्यानं विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसह अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. भारतासाठी सर्वात कमी सामने खेळताना पहिलं टी20 शतक ठोकण्याचा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता. त्यानं तिसऱ्या सामन्यात हा पराक्रम केला होता. पण अभिषेकनं दुसऱ्याच सामन्यात ही कामगिरी केली. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सहाव्या सामन्यात शतक झळकवलं आहे.
टीम इंडियासाठी टी20 मध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत अभिषेक चौथ्या स्थानावर आहे. या यादीत यशस्वी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं वयाच्या 21 वर्षे 279 दिवसांत शतक झळकावलं. शुबमन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अभिषेक शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. अभिषेकनं वयाच्या 23 वर्षे 307 दिवसांत टीम इंडियासाठी टी20 शतक झळकावलं.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषक फायनलनं अवघ्या 24 तासात मोडले सर्व रेकॉर्ड! आयसीसीनं जाहीर केली आकडेवारी
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा! आगामी आयसीसी स्पर्धांसाठी दिलं अपडेट
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना मिळालं टीममध्ये स्थान