न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेकने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
अभिषेकने शानदार खेळी केली असली तरी, तो आपला ‘गुरू’ युवराज सिंगचा (Yuvraj Singh) (12 चेंडूत अर्धशतक) विक्रम मोडू शकला नाही. सामन्यानंतर जेव्हा त्याला विचारण्यात आले की, भविष्यात युवीचा हा विक्रम मोडीत निघू शकतो का?, तेव्हा अभिषेकने अतिशय मजेशीर उत्तर दिले.
अभिषेक म्हणाला, युवराज पाजींचा रेकॉर्ड मोडणे कोणासाठीही खूप कठीण आहे. पण क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही, कोणताही फलंदाज हा पराक्रम करू शकतो. अभिषेकने पुढे असेही सांगितले की, या मालिकेत सर्वच भारतीय फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहेत.






