संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबी शहरात सध्या टी१० लीगचा थरार चालू आहे. रविवारी (३१ जानेवारी) या लीगच्या साखळी फेरीतील अकरावा सामना नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध बांग्ला टायगर्स संघात पार पडला. नॉर्दर्न वॉरियर्सनी ३० धावांनी या सामन्यात विजयी पताका झळकावली. निर्धारित १० षटकांच्या या सामन्यादरम्यान नॉर्दर्न वॉरियर्सचा कर्णधार निकोलस पूरन याने अविश्वसनीय कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पूरनने २६ चेंडूत ३४२.३१ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत ८९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि तब्बल १२ षटकार मारले. म्हणजे पूरनच्या ८९ धावांतील ८४ धावा तर त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडतच बनवल्या आणि अवघ्या ५ धावा पळून काढल्या. त्याच्या या तूफानी खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अबु धाबी टी१० लीगमधील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, पूरनने एकूण ३ सामने खेळले आहेत. यादरम्यान ५४.००च्या सरासरीने त्याने १६२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १८ षटकार आणि १० चौकारांचा समावेश आहे.
असा झाला थरारक सामना
नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध बांग्ला टायगर्स संघात झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्दर्न वॉरियर्सने ४ बाद १६२ धावा केल्या. यात पूरनव्यतिरिक्त सलामीवीर लिंडल सिमन्स याने ४१ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात बांग्ला टायगर्स संघ १० षटकात ३ बाद १३२ धावाच करू शकला. त्यामुळे नॉर्दर्न वॉरियर्सने ३० धावांनी सामना खिशात घातला.
आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा आहे भाग
विशेष म्हणजे, निकोलस पूरन हा जगप्रसिद्ध आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा प्रमुख फलंदाज आहे. गतवर्षी पंजाबकडून १४ सामने खेळताना २ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ३५३ धावा केल्या होत्या. येत्या ३-४ महिन्यात आयपीएलचा पुढील चौदावा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अबु धाबी टी१० लीगमधील दमदार प्रदर्शनाचा पूरनला आयपीएलमध्येही फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ही कसली भानगड! २८ वर्षांचा दीपक चाहर झाला थेट ४८ वर्षांचा, बहिणीने केलं ट्रोल
दुनियेचं काय घेऊन बसलात, ‘हे’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही आहेत डिविलियर्सचे चाहते, पाहा ट्विट्स
IND Vs ENG : अवघ्या १२ विकेट्स अन् अश्विन कसोटीतील ‘या’ शानदार विक्रमात ठरेल दुसराच