यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर काही खेळाडू थकलेले दिसून येत आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर लगेचच भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका पार पडणार आहे. या मालिकेच्या दृष्टीने बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे रोहित शर्माला हे पद देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन केएल राहुलला संघाचे कर्णधारपद देण्यात येऊ शकते.
बोर्डाच्या एका सूत्राने एएनआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, “संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच माहित आहे की, केएल राहुल या संघातील एक प्रमुख सदस्य आहे. तो संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.” मुख्य बाब म्हणजे न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती दिली जाणार आहे.
प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याबाबत बोलताना बीसीसीआयच्या सूत्राने म्हटले की, “आम्ही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करू देऊ, पण पूर्ण क्षमतेने नाही. स्थानिक प्रशासनाशी बोलून त्यानुसार योजना आखली जाईल.” भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील टी-२० सामने १७, १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर आणि दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यांनतर जसप्रीत बुमराहने म्हटले होते की, “तुम्हाला बऱ्याचदा सुट्टीची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या कुटुंबाला सतत मिस करत असता. परंतु भारतीय खेळाडू गेले ६ महिने सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. याचा कुठे ना कुठे आमच्या डोक्यावर परिणाम होतो आहे. पण आम्ही प्रत्यक्षात मैदानावर असताना या गोष्टी आमच्या डोक्यात नसतात. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रणात नाही ठेवू शकत. बायो बबलमध्ये राहाणे आणि आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहाणे, तेही इतक्या दीर्घ कालावधीसाठी. यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.” त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ३ अनफिट खेळाडूंवर विश्वास दाखवून निवडकर्त्यांनी केली चूक? टी२० विश्वचषकात ठरतायत फेल
ब्रेकिंग! पुन्हा मैदानावर दिसणार षटकारांची आतषबाजी; माजी अष्टपैलू युवराजने केली पुनरागमनाची घोषणा





