राम चरण आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला स्पोर्ट्स ड्रामा ‘पेद्दी’ चित्रपटाचा भव्य संगीत प्रकाशन सोहळा भोपाळमध्ये पार पडला. यावेळी अभिनेता राम चरणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याला त्याच्यासोबत एआर रहमान, जान्हवी कपूर आणि बाकी टीम मेंमर्सही उपस्थित होते. एका संवादादरम्यान, राम चरणला भारतीय क्रिकेटपटूंचे थोडक्यात वर्णन करण्यास सांगितले.
राम चरणने सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला ‘एक दिर्घ दिग्गज प्रवास’, एमएस धोनीचे वर्णन ‘शांत आणि संयमी’, रोहित शर्मा ‘सर्वांचा माणूस’, विराट कोहलीला ‘फायर’ असे वर्णन त्याने केले. यावेळी त्याने जसप्रीत बुमराहबद्दलही काही म्हटले ज्यामुळे चर्चा सुरू झाली. त्याने बुमराहचे वर्णन करताना तो त्याचा सर्वात मोठा चाहता आहे, मात्र त्याचे कौतुक करताना चुकून त्याने क्रिकेट आणि फुटबॉल यांची सरमिसळ केली. त्याच्या या वक्तव्याची क्लिप लगेचच व्हायरल झाली.
राम चरणने नंतर सोशल मीडियामार्फत झालेल्या चुकीची माफी मागितली. त्याने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर लिहिले, “मला कधीकधी नावे लक्षात ठेवण्याचा खरोखरच खूप विसर पडतो. झालेल्या गोंधळाबद्दल जसप्रीत बुमराह यांची मी क्षमा मागतो. त्या सर्व उत्साहाच्या आणि गर्दीच्या गदारोळात झालेली ही एक अगदीच स्वाभाविक मानवी चूक होती. मी तुमचा मनापासून आदर करतो आणि तुमच्या खेळाचा मी एक मोठा चाहता आहे. जेव्हा तुम्ही फलंदाजांना सातत्याने बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडता, तेव्हा तुम्ही प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटायला लावता.”
सध्या बुमराह आयपीएल २०२६ मध्ये व्यस्त आहे. तो मुंबई इंडियन्सचा भाग असून त्याच्यासाठी हा हंगाम निराशाजनक ठरत आहे. त्याला या हंगामाच्या सुरुवातीला काही काळ विश्रांती दिली होती. तो टी२० विश्वचषकापासून किरकोळ दुखापतींची झगडत होता, असा खुलासा एमआयचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी केला होता.
बुमराहला आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये केवळ ४ विकेट्स मिळवता आल्या आहेत. तो लवकरच लयीत येईल अशी आशा प्रशिक्षकांना आहे. आज (२४ मे) मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. मुंबई या हंगामातून बाहेर झाला असून राजस्थानसाठी मात्र प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.






