ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेत झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा आता भारताचा कर्णधार असणार नाही, असं बोललं जात आहे. रोहितनं मात्र एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, तो सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात नाही. असं असलं तरी अनेक माजी क्रिकेटपटू रोहितच्या भविष्याबद्दल सातत्यानं आपलं मत मांडत आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट यानं यावर आपली भूमिका मांडली.
गिलख्रिस्टच्या मते, रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध जूनमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा हिस्सा असणार नाही. या मालिकेसाठी भारतीय संघाला नवा कर्णधार मिळणार असल्याचं गिलख्रिस्टचं म्हणणं आहे. गिलख्रिस्टनं या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व कोण करेल? त्या खेळाडूचं नाव देखील सांगितलं. आश्चर्याचं म्हणजे, तो खेळाडू जसप्रीत बुमराह नाही!
ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला, “माझ्या मते रोहित शर्मा इंग्लंडला जाणार नाही. अशा परिस्थितीत भारताचा कर्णधार कोण होणार? जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा फुलटाईम कर्णधार होणार का? तो ही जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार आहे का? माझ्या मते बुमराहसाठी हे आव्हानात्मक ठरेल.”
गिलख्रिस्ट पुढे बोलताना म्हणाला, जर विराट कोहलीला ही जबाबदारी मिळाली, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. भारतीय संघ यावेळी कर्णधारासाठी झगडत आहे. भारताकडे या पदासाठी फारसे विकल्प नाहीत. त्यामुळे विराट कोहलीकडे पुन्हा ही जबाबदारी येऊ शकते.”
इंग्लंडचे माजी खेळाडू मायकल वॉन यांच्या मते, जसप्रीत बुमराह भारताचा पुढील कसोटी कर्णधार होणार आहे. बुमराहनं पर्थ आणि सिडनीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघानं चांगली कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह भारताचा कर्णधार आणि शुबमन गिल उपकर्णधार होईल, असं मायकल वॉन म्हणाले.
हेही वाचा –
आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतला मोठा फायदा, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला!
मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार, व्हिडिओ पोस्ट करून दिला निवड समितीला संदेश! आता तरी संधी मिळणार का?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानची मोठी खेळी, पाकिस्तानातही ‘भारतीय फॉर्म्युला’ आजमावणार