मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली युएईमध्ये आयपीएल 2020 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे आरसीबीचा एक गोलंदाज इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो गोलंदाज म्हणजे ऍडम झम्पा. त्याने इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या मँचेस्टर वनडे दरम्यान 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो 2019 पासून झम्पा वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
वर्ष 2019 पासून झम्पाने वनडेत 40 विकेट्स घेतल्या आहेत. 2019 पासून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत झम्पाने कुलदीप यादवला मागे टाकले आहे. कुलदीप दुसऱ्या क्रमांकवार आहे. त्याने 37 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ युजवेंद्र चहल आणि आदिल रशीदने 35 विकेट्ससह विभागून चौथ्या क्रमांकावर आहेत.
मँचेस्टर वनडे सामन्यात जो रुटला बाद करून झम्पाने कुलदीपला मागे टाकण्याचा कारनामा केला. झम्पाची फिरकी गोलंदाजी जो रूट समजू शकला नाही आणि स्लिपमध्ये उभा असलेल्या अॅरॉन फिंचने त्याचा झेल टिपला.
झम्पा आयपीएलपूर्वी पूर्णपणे लयीत दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली. तसेच वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात या गोलंदाजाने चार गडी बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तर दुसऱ्या वनडेतही त्याने 3 विकेट्स घेतल्या.