आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला संघर्ष करायला लावणाऱ्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाचे नाव वरच्या क्रमांकामध्ये आहे. पण असे असले तरी या दोघांमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएल 2020 च्या हंगामादरम्यान चांगली मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीबद्दल झम्पाने नुकतेच भाष्य केले आहे. त्याने विराट मैदानाबाहेर एक व्यक्ती म्हणून कसा आहे, हे देखील सांगितले आहे.
आयपीएल 2020 मध्ये विराट आणि झम्पा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून एकत्र खेळले. त्यामुळे त्यांनी यादरम्यान काही काळ एकत्र घालवला.
झम्पाला विराटने केला व्हॉट्सऍप मेसेज
विराटबद्दल द सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना झम्पाने एक किस्सा सांगितला आहे. झम्पा म्हणाला, ‘मी आयपीएल 2020 साठी आलो तेव्हा पहिल्याच दिवशी त्याने (विराटने) मला व्हॉट्सऍप मेसेज केला. माझ्याकडे त्याचा नंबर नव्हता. त्याने परिस्थिती अशी तयार केली की जसे आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो. त्याने मला मेसेज केला होता की झॅम्स, डिलेवरुच्या वेगन रेस्टोरंटचे हे 15 डॉलर ऑफचे वाऊचर आहे. ते खुप चांगले रेस्टोरंट आहे.’
मैदानाबाहेरचा वेगळा विराट
विराटबद्दल बोलताना झम्पा पुढे म्हणाला, ‘विराट मैदानाबाहेर असला की तो खुप मजेशीर व्यक्ती आहे. तो बसमध्ये युट्यूबरील व्हिडिओ पाहून खूप हसतो. एकदा एक गमतीशीर रनआऊट पाहून तो सलग 3 आठवडे त्यावरुन हसत होता.’
तसेच झम्पाने सांगितले की त्याची आणि विराटची प्रवास आणि कॉफी याबाबत चर्चा व्हायची. त्याचबरोबर झम्पाने असेही सांगितले की अशा व्यक्तींबरोबर वेळ घालवल्यानंतर समजते की तो तूमच्यासारखा एक व्यक्ती आहे.
झम्पा ठरला होता विराटची डोकेदुखी
झम्पाने विराटला नजीकच्या काळात खूप त्रास दिला आहे. त्याने विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 वेळा बाद केले आहे. जॅम्पा आणि विराट आत्तापर्यंत 13 वनडे सामन्यात आमने-सामने आले आहेत. यातील 5 सामन्यात झम्पाने विराटला बाद केले आहे. तसेच 8 टी20 सामन्यात हे दोघे आमने-सामने आले आहेत. यात जॅम्पाने टी20 मध्ये 2 वेळा विराटला बाद केले आहे.
झम्पाने आयपीएल 2020 मध्ये 3 सामने खेळले आहेत. आता तो आणि विराट आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील मर्यादीत षटकांच्या मालिकांमध्ये एकमेकांसमोर उभे रहाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा संघ पडला केएल राहुलच्या संघावर भारी; टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येच रंगला सामना, पाहा फोटो
आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत
‘रोहित आणि इशांतला कसोटी मालिका खेळायची असेल तर ३-४ दिवसात विमानात बसावे लागेल, अन्यथा..’