हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये प्रेक्षकांच्या पुनरागमनाने खेळाडूंचे मनोबल उंचावलेले दिसतेय आणि त्यामुळेच एफसी गोवाची कामगिरी सूसाट सुरू आहे. यजमानांना येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी बंगळुरू एफसीचा सामना करायचा आहे. एफसी गोवाने या पर्वाच्या सुरुवातीला सलग दोन विजयांची नोंद केली होती आणि त्यानंतर त्यांना उद्या बाजी मारून पुन्हा सलग विजय नोंदवण्याची संधी आहे. बंगळुरू एफसीला मागील चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे यजमान एफसी गोवाचे पारडे जड मानले जात आहे.(League Standings)
केरळा ब्लास्टर्सकडून झालेल्या पराभवानंतर एफसी गोवाने खेळाचा दर्जा उंचावताना मागील सामन्यात एटीके मोहन बागानवर ३-० अशा विजयाची नोंद केली. बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या नोआ सदौईने याही सामन्यात गोल केला आणि या त्याचा या पर्वातील चौता गोल ठरला. हिरो आयएसएल २०२२-२३मध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या चेन्नईयन एफसीच्या अल खयाती आणि केरळा ब्लास्टर्स एफसीच्या इव्हान कलियुझ्नी यांच्यासह सदौईने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.
अल्व्हारो व्हॅझकेज दुखापतीतून सावरल्यामुळे मोहन बागान विरुद्ध त्याला सुरुवातीपासून मैदानावर उतरवले, परंतु मागील दोन सामन्यांत त्याला गोल करता आलेला नाही. या सामन्याच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना म्हणाले की,”हा सामना खूप आव्हानात्मक असणार आहे. आम्ही अशा संघाचा सामना करणार आहोत की जे आता चांगल्या मूडमध्ये नाहीत. त्यांच्या संघात खूप चांगले खेळाडू आहेत. उद्याचा सामना हा आतापर्यंतचा आव्हानात्मक सामना असेल.”
बंगळुरू एफसीची कामगिरी काही खास झालेली नाही. पहिल्या लढतीत विजयानंतर एक अनिर्णित निकाल लागला आणि त्यापाठोपाठ बंगळुरूने चार पराभव पत्करले. मागील सामन्यात मुंबई सिटी एफसीकडून त्यांना ४-० असा दारूण पराभव पत्करावा लागला. २०२०-२१च्या हिरो आयएसएल पर्वात बंगळुरूला सलग चार पराभव पत्करावे लागले होते आणि त्या नकोशा विक्रमाची त्यांनी पुन्हा बरोबरी केली. (Club Statistics)
पराभवापेक्षा गोल न होणे, ही त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या आहे. आयएसएल इतिहासात चार सलग सामन्यांत गोल न करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. आणखी एक पराभव अन् त्यांच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला जाईल. सिमॉन ग्रेसन यांच्या संघाला सहा सामन्यांत केवळ दोन गोल करता आले आहेत. बंगळुरू एफसीसाठी संतुलित संघ ग्रेसन यांना अद्याप शोधता आलेला नाही, परंतु आता त्यांना याची नितांत गरज आहे.
कर्णधार सुनील छेत्रीला मागील सामन्यात बाकावर बसवले होते. दानिष फारूकला लेफ्ट फ्लँकवर खेळवले, परंतु तो प्रयोग अपयशी ठरला. ”मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंनी माझा रुद्रावतार पाहिला. सार्वजनिक ठिकाणी मी नेहमी खेळाडूंना पाठिंबा देतो, परंतु मुंबईविरुद्ध दुसऱ्या हाफमध्ये झालेल्या खेळानंतर माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे होते. पण, मला खेळाडूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि सरावा दरम्यान तो दिसला. त्यामुळे एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात खेळाडू त्याच सकारात्मक ऊर्जेने खेळतील अशी आशा आहे,”असे ग्रेसन म्हणाले.
हिरो आयएसएलमध्ये उभय संघ ११ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आणि यात २०१८-१९च्या फायनलचाही समावेश आहे. बंगळुरू एफसीने तेव्हा ट्रॉफी उंचावली होती. उभय संघांमध्ये बंगळुरूने सर्वाधिक ५ विजय मिळवले आहेत, तर गोवाच्या वाट्याला तीन विजय आले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली सुपरमॅन आहे, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचे विराटबद्दल भावनिक वक्तव्य
रिषभ पंत ट्रोलर्सच्या निशाण्यावर, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यातही अपयशी