अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड एकदिवसीय मालिका संपली आहे. अफगाणिस्ताननं ही तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे वाहून गेला होता. तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी (12 मार्च) शारजाहच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्ताननं आयर्लंडवर 117 धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एक संस्मरणीय घटना घडली.
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम धर्माचे लोक दिवसभर कडक उपवास पाळतात. दरम्यान, अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आपला उपवास मैदानावरच सोडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि मोहम्मद नबी यांनी मैदानावर खजूर खाऊन उपवास सोडला. तेव्हा हे दोघंही फलंदाजी करत होते.
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना रमजानचा उपवास तोडण्यासाठी काही मिनिटं थांबवण्यात आला. कर्णधार शाहिदी आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू नबी गुडघ्यावर बसून खजूर खात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. नबी मैदानावर पाणी पितानाही दिसला. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये उपवास सोडला.
— Cric guy (@Cricguy88) March 13, 2024
नुकताच इस्लामचा सर्वात पवित्र महिना रमजान सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लिम लोक सकाळी सूर्योदयापूर्वी ‘सेहरी’ खातात आणि नंतर दिवसभर काही न खाता राहतात. यानंतर, सूर्यास्ताच्या वेळी जेवण होतं, ज्याला ‘इफ्तार’ म्हणतात.
तिसऱ्या वनडेबद्दल बोलायचं झालं तर, आयर्लंडनं नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. अफगाणिस्ताननं निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 236 धावा केल्या. शाहिदीनं आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 103 चेंडूत 4 चौकारांसह 69 धावांची खेळी केली. त्यानं नबी (62 चेंडूत 48, तीन चौकार) सोबत पाचव्या विकेटसाठी 97 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रहमानउल्ला गुर्जाबनं (51) अर्धशतक झळकावलं.
प्रत्युत्तरात, आयर्लंडचा डाव 35 षटकांत 119 धावांत गुंडाळला गेला. पॉल स्टर्लिंग (50) आणि कर्टिस कॅम्फर (43) यांच्याशिवाय कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. नबीनं 5 तर नांगेलिया खरोतीनं 4 गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?