अफगाणिस्तान ‘अ’ संघानं इमर्जिंग आशिया कप 2024 चा खिताब पटकावला आहे. त्यांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाचा पराभव केला. फायनलमध्ये अफगाणिस्ताननं 7 गडी राखून सहज विजय मिळवला. अशाप्रकारे अफगाणिस्ताननं स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं आहे.
या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 133 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तराच्या, अफगाणिस्ताननं 19व्या षटकात अवघे 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं. धावसंख्या अवघी 15 होती तोपर्यंत श्रीलंकेचे चार प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
श्रीलंकेच्या पहिल्या चारपैकी एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. यशोदा लंका (1), लाहिरू उदारा (5), नुवानिडू फर्नांडो (4), अहान विक्रमसिंघे (4) यांनी निराशा केली. यानंतर पवन रथनायके आणि सहान अरचिगे यांनी मिळून डावाची धुरा सांभाळत पाचव्या विकेटसाठी 50 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पवन 20 धावा करून बाद झाला. त्याचवेळी सहान अरचिगेनं नाबाद 64 धावा केल्या, तर निमेश विमुक्तीनं 23 धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे संपूर्ण 20 षटकं खेळल्यानंतर श्रीलंकेनं 7 गडी गमावून 133 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून बिलाल सामीनं सर्वाधिक 3 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांची पहिली विकेट पहिल्याच चेंडूवर पडली. झुबैद अकबरी हा गोल्डन डक झाला. मात्र यानंतर अफगाण संघानं सावध फलंदाजी केली. कर्णधार दरवेश रसूली 24 धावा करून बाद झाला, तर करीम जनात 33 धावा करण्यात यशस्वी ठरला. अफगाणिस्तानच्या डावात सेदीकुल्लाह अटलनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं 55 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. तर यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद इशाक 16 धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा –
‘भारताला चेतेश्वर पुजाराची उणीव भासेल’, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी मुख्य निवडकर्त्याचे विधान
WTC 2023-25च्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत हे पाच संघ
IND vs NZ; वानखेडे मैदानावर रविचंद्रन अश्विन रचणार इतिहास!