टी20 विश्वचषक 2024 चा 14 वा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर हा पहिला विजय आहे.
अफगाणिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाजच्या शानदार फलंदाजीच्या बळावर 20 षटकांत 6 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि संपूर्ण संघ 15.2 षटकांत केवळ 75 धावा करून ऑलआऊट झाला.
अफगाणिस्तानचा चालू टी20 विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय असून आता त्यांचा सुपर-8 मधील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. या विजयासह अफगाणिस्तानचा संघ ‘क’ गटात पहिल्या स्थानावर आला असून त्यांचे पुढील दोन सामने पापुआ न्यू गिनी आणि वेस्ट इंडिजविरुद्ध आहेत. यातील एक सामना जिंकून अफगाणिस्तानचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, न्यूझीलंड किंवा वेस्ट इंडिज यापैकी कोणताही एक संघ अडचणीत येऊ शकतो, कारण एका गटातून दोनच संघ पुढील फेरीत जाऊ शकतात.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्तान संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज (80) आणि इब्राहिम झद्रान (44) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 159 धावा केल्या. या दोघांशिवाय अफगाणिस्तानकडून अजमतुल्लानं 22 धावा केल्या, तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीनं 2-2 विकेट घेतल्या.
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवेपासून कर्णधार केन विल्यमसनपर्यंत सर्वजण फ्लॉप ठरले. पहिल्या 10 षटकांत संघानं 53 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. तर 15.2 षटकांत संपूर्ण संघ 75 धावांवर गारद झाला.
अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि फजलहक फारुकी यांनी गोलंदाजीत धुमाकूळ घातला. दोघांना 4-4 बळी मिळाले. तर मोहम्मद नबीनं 2 बळी घेतले. रहमानउल्ला गुरबाजला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिझपर्यंत पोहोचूनही धावबाद झाला ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील विचित्र घटना; पाहा संपूर्ण VIDEO
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव