अफगाणिस्तान क्रिकेट संघानं रविवारी (23 जून) ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 टप्प्यातील सर्वात मोठा अपसेट केला. राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघानं कांगारुंचा 21 धावांनी पराभव केला.
गेल्या काही काळापासून अफगाणिस्तानच्या संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरी करत अनेक मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. तर सध्याच्या टी20 विश्वचषकात त्यांनी न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या या यशाचं श्रेय मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो यांना जातं.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉट यांनी जुलै 2022 मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ 18 महिन्यांचा होता, जो 2023 मध्ये संपला. मात्र त्यांच्या नेतृत्वात संघानं चांगली कामगिरी केल्यानं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं ट्रॉट यांचा करार एका वर्षासाठी वाढवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्ताननं उल्लेखनीय यश संपादन केलं असून अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी संघाचा गोलंदाजी सल्लागार बनवलं होतं. आता त्याच्या मार्गदर्शनाखील अफगाण गोलंदाज विश्वचषकात कहर करत आहेत. अफगाण संघानं साखळी फेरीतील सामन्यात न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला अवघ्या 75 धावांवर ऑलआऊट केलं. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 148 धावांचा बचाव करून कमाल केली आहे. अफगाणिस्तानचा फझलहक फारुकी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असून त्यानं 6 सामन्यात 15 बळी घेतले आहेत.
हा विजय अफगाणिस्तानसाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. इतिहासात अफगाणिस्ताननं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. विशेष म्हणजे, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला होता, कारण महिला क्रिकेट संघाला अफगाणिस्तानमध्ये खेळण्याचा अधिकार नाही. सप्टेंबर 2021 मध्ये तालिबाननं या देशाचा ताबा घेतल्यापासून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देण्याची ही तिसरी वेळ होती.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाण गोलंदाजांचा करिष्मा! ऑस्ट्रेलियाला हरवून असा रचला इतिहास; कांगारुंसाठी सेमीफायनलचं समीकरण बिघडलं
अफगाणिस्ताननं घेतला मागील पराभवाचा बदला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर
आता वर्ल्ड कप आपलाच! हे आहेत भारताच्या बांगलादेशवरील दणदणीत विजयाचे 5 नायक






