अफगाणिस्तानचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुलावायो येथे खेळला गेला. हा सामना अफगाणिस्ताननं 72 धावांनी जिंकला. यासह अफगाणिस्ताननं ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. अफगाणिस्ताननं कोणतीही कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 157 धावा केल्या. प्रत्युत्तराच्या डावात झिम्बाब्वेच्या फलंदाजांकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. यजमानांनी पहिल्या डावात 243 धावा केल्या आणि 86 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. अशा प्रकारे अफगाण संघ पहिल्या डावात पिछाडीवर होता.
मात्र, दुसऱ्या डावात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी करत रहमत शाह (139) आणि इस्मत आलम (101) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 363 धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वेला दुसऱ्या डावात 278 धावांचं लक्ष्य मिळालं. मात्र फिरकीपटू राशिद खानच्या घातक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 205 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे अफगाणिस्ताननं हा सामना 72 धावांनी जिंकला.
अफगाणिस्तानच्या या विजयाचा नायक ठरला राशिद खान. त्यानं या सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्यानं 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या डावात त्यानं 7 बळी घेतले. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.
अफगाणिस्ताननं 2018 मध्ये भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तानचा संघ एकदाच मालिका बरोबरीत राखण्यात यशस्वी ठरला आहे. त्यांनी 2020-21 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता अफगाणिस्तानला झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या कसोटी मालिका विजयाची चव चाखयला मिळाली. अफगाणिस्तानसारख्या छोट्या संघासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे.
हेही वाचा –
मुंबईच्या 17 वर्षीय खेळाडूचा धमाका! अवघ्या 67 चेंडूत ठोकलं शतक
आता कसोटी क्रिकेट नव्या पद्धतीनं खेळलं जाणार, बदलू शकतात अनेक नियम!
“रोहित शर्मानं आता कॉमेडियन व्हावं”, हिटमॅनच्या खराब कामगिरीनंतर माजी खेळाडूची टीका