जवळपास दोन दशकांनंतर आफ्रो-आशिया चषक पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. यामध्ये आशिया इलेव्हन आणि आफ्रिका इलेव्हन यांच्यात मर्यादित षटकांचे सामने होतील. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशन (एसीए) ने आपल्या वार्षिक परिषदेत ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. यामध्ये सहा सदस्यांची अंतरिम समितीही स्थापन करण्यात आली आहे. आफ्रिकन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक संधी निर्माण करणे हा या समितीचा उद्देश आहे.
ही स्पर्धा पुन्हा झाल्यास भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना एकाच संघात खेळताना पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल. ते सध्या फक्त आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रेक्षकांसाठी ही मोठी पर्वणी असेल. या स्पर्धेत विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान सारखे खेळाडू एकाच संघात खेळू शकतात.
“आफ्रो-आशिया चषक हा आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. दोन्ही खंडांतील खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे,” असं आफ्रिकनं क्रिकेट असोसिएशनचे अंतरिम अध्यक्ष आणि झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंगा मुखलानी म्हणाले. आशियाई क्रिकेट परिषदेकडून (एसीसी) अद्याप या स्पर्धेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी ही स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
आफ्रो-आशिया चषक आतापर्यंत फक्त दोन वेळा खेळला गेला आहे. 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आणि 2007 मध्ये भारतात याचं आयोजन करण्यात आलं होतं. 2005 आफ्रो-आशिया कपमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि उर्वरित सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. तर 2007 च्या स्पर्धेत आशिया इलेव्हननं तिन्ही सामने जिंकले होते. 2009 साली केनियामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु तेव्हा ही स्पर्धा काही कारणामुळे आयोजित होऊ शकली नाही. आता जवळपास वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा याचा गांभीर्यानं विचार केला जात आहे.
हेही वाचा –
आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची धमाल, रोहित-कोहली टॉप 20 मधून बाहेर!
कमबॅक असावा तर असा! बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला प्रथमच मिळाली मोठी जबाबदारी
“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य