Abhishek Nayar On Team India Defeat :- रविवारी (04 ऑगस्ट) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना भारतीय संघाने 32 धावांनी गमावला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 9 बाद 240 धावा केल्या. प्र्त्युत्तरात फिरकीपटूसाठी पोषक अशा खेळपट्टीवर श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वँडरसेने भारतीय फलंदाजांची कोंडी केली. कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली, केएल राहुल अशा भारतीय फलंदाजांना बाद करत त्याने सामना श्रीलंकेच्या बाजूने वळवला. भारताच्या 6 विकेट्स काढत 42.2 षटकांतच वँडरसेने श्रीलंकेचा विजय निश्चित केला. श्रीलंकेने 32 धावांनी दुसरा वनडे जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय फलंदाजांच्या खराब प्रदर्शनानंतर आता संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीवर पराभवाचा ठपका ठेवला आहे. खेळपट्टीवर चेंडू खूप फिरकी घेत होता आणि अशा परिस्थितीत सामना दोन्ही बाजूंनी वळू शकला असता, असे नायरचे म्हणणे आहे.
नायर म्हणाला, “हे आश्चर्यकारक होते पण तुम्हाला माहिती आहे की अशा परिस्थितीत सामना दोन्ही बाजूने वळला असता, कारण खेळपट्टीला खूप फिरकी मिळत होती. पहिल्या सामन्यातही बघितले तर नवीन चेंडूवर धावा काढणे थोडे सोपे होते. चेंडू जुना झाल्यानंतर फलंदाजी करणे सोपे नव्हते, विशेषतः जेव्हा तुम्ही नंतर फलंदाजी करत असता. काही प्रसंगी, विशेषतः 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्या डावात फिरकीसाठी पोषक खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण जाते.”
भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकाने पुढे सांगितले की, “संघ व्यवस्थापन आतापर्यंत संघाच्या बाजूने न गेलेल्या गोष्टींचा विचार करेल. ज्या गोष्टी सुधारायला हव्यात त्याकडे लक्ष द्यावे लागेल. सलग दुसऱ्या सामन्यात असे का घडले? याचा विचार करावा लागेल. पहिल्या सामन्यात आम्ही काही प्रमाणात भागीदारी राखण्यात यशस्वी झालो, पण या सामन्यात आम्ही सातत्याने विकेट गमावल्या.”
मधल्या फळीत झालेल्या बदलावर नायर काय म्हणाला?
नायर म्हणाला, “माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळत असता तेव्हाच खेळातील फलंदाजीची स्थिती महत्त्वाची असते. जेव्हा मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली फलंदाजी करणे अपेक्षित असते तेव्हा मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्या. मला वाटते की, मधल्या फळीतील बदल करण्याचा निर्णय योग्य होता. पण जेव्हा हा निर्णय कार्य करत नाही तेव्हा अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मधल्या फळीतील फलंदाज मधल्या फळीत फलंदाजी करत होते हे लक्षात घेऊन हा निर्णय योग्य होता असे मला वाटते.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…
टेबल टेनिसमध्ये भारताचा धमाका, महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये दाखल…!
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं