ऑनलाईन गेमिंगसंदर्भातील संशोधन आणि त्यानंतर झालेल्या बदलांमुळे बीसीसीआय आणि ड्रीम11 यांच्यातील करार संपुष्टात आला आहे. मूळ करार मार्च 2026 पर्यंत असणार होता, पण तो 6 महिने आधीच संपवण्यात आला. ऑनलाइन गेमिंगमध्ये झालेल्या सुधारणा आणि नियमांमुळे ड्रीम 11 ला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) नवीन जर्सी स्पॉन्सर शोधत आहे.
बीसीसीआयने स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर निश्चित केली आहे. म्हणजेच कोणत्याही कंपनीला या तारखेपूर्वी अर्ज करावा लागेल. जर्सी स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने तीन वर्षांसाठी 400 कोटी रुपयांचा बेस प्राइस ठेवला आहे. रिपोर्ट्सनुसार टोयोटाने या डीलमध्ये रस दाखवला आहे. मात्र, आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारतीय संघ कोणत्याही जर्सी स्पॉन्सरशिवाय खेळणार आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच असे होणार आहे, की भारतासारखी मोठी टीम मोठ्या स्पर्धेत स्पॉन्सरशिवाय उतरणार आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये जर्सी स्पॉन्सरशिपला मोठे महत्त्व आहे, कारण यामधून बीसीसीआयला प्रचंड उत्पन्न मिळते. ड्रीम 11 पूर्वी बायजूस (BYJuS) आणि त्याआधी ओप्पो (OPPO) हे मोठे स्पॉन्सर राहिले आहेत. या स्पॉन्सरशिप डीलमुळे केवळ बोर्डलाच फायदा होत नाही, तर चाहत्यांमध्ये जर्सीवरील ब्रँडचीही मोठी लोकप्रियता वाढते. त्यामुळे ड्रीम 11 नंतर कोणता नवा ब्रँड भारतीय संघाशी जोडला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






