---Advertisement---

भारत-पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेची जबाबदारी; ‘या’ दिग्गज प्रशिक्षकाची सनथ जयसूर्या ऐवजी नियुक्ती

On: सोमवार, मार्च 9, 2026 9:07 PM
---Advertisement---

२०२६ चा टी-२० वर्ल्ड कप श्रीलंकेसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. संघाने ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी करत ‘सुपर-८’ मध्ये मजल मारली होती, परंतु तिथे त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. या खराब कामगिरीमुळे श्रीलंकेचे सेमीफायनलचे स्वप्न भंगले. वर्ल्ड कपमधील या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली होती. आता त्यांच्या जागी श्रीलंकेने अशा एका दिग्गजाकडे जबाबदारी सोपवली आहे, ज्यांनी यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या संघांनाही प्रशिक्षण दिले आहे.

​श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची पुरुष राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवीन प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ १५ एप्रिलपासून सुरू होईल.

​या आफ्रिकन दिग्गजाने २००८ ते २०११ या काळात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने २०११ च्या वनडे वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले होते. याशिवाय त्यांनी पाकिस्तानच्या ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. २०११ ते २०१३ दरम्यान ते दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आफ्रिकेचा संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये जगात नंबर वन बनला होता.

​नुकत्याच संपलेल्या २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये गॅरी कर्स्टन यांनी नामिबिया संघासाठी सल्लागाराची भूमिका बजावली होती. अनेक संघांना शिखरावर पोहोचवणाऱ्या कर्स्टन यांचा श्रीलंकेसोबतचा प्रवास कसा राहतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

​गॅरी कर्स्टन यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी १०१ कसोटी आणि १८५ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीच्या १७६ डावांमध्ये त्यांनी ४५.२७ च्या सरासरीने ७,२८९ धावा केल्या, ज्यात २१ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे (सर्वोच्च धावसंख्या २७५). तसेच, १८५ वनडे डावांमध्ये त्यांनी ४०.९५ च्या सरासरीने ६,७९८ धावा केल्या असून, यात १३ शतके आणि ४५ अर्धशतके झळकावली आहेत (सर्वोच्च धावसंख्या १८८*).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---