बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल 2026 मधून बाहेर काढण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावपूर्ण संबंध पाहता, बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) रहमानला आपल्या संघातून बाहेर करण्याचे निर्देश दिले होते. केकेआरने यावर त्वरित कारवाई करत बांगलादेशी गोलंदाजाला संघातून काढून टाकले आहे. या निर्णयावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, रहमानने एक मोठे पाऊल उचलले असून आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर तो आता ‘पाकिस्तान सुपर लीग’ (PSL) खेळताना दिसणार आहे. रहमान पीएसएलमध्ये सामील होणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.
पाकिस्तान सुपर लीगने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी फलंदाजांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून रहमान पीएसएलचा आगामी हंगाम खेळणार असल्याचे सांगितले. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “फलंदाजांना आता सावध राहावे लागेल. एका नवीन युगात ‘फिज’ची एन्ट्री होणार आहे. मुस्तफिजुर रहमान पीएसएल 11 (PSL 11) चा भाग असणार आहे.” पाकिस्तान सुपर लीगचा लिलाव (Auction) होणार असून त्यात रहमानचे नाव समाविष्ट असेल.
आयपीएल 2026 च्या लिलावात मुस्तफिजुर रहमानवर कोटींची बोली लागली होती. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 9.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीग ही खूपच छोटी स्पर्धा असून तिथे खेळाडूंना कमी मानधन मिळते. पीएसएलला जगातील सर्वात ‘गरीब’ क्रिकेट लीग म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत, आता लिलावात रहमानवर अत्यंत कमी बोली लागेल. आयपीएलमध्ये त्याला जेवढा फायदा झाला असता, त्याच्या तुलनेत पीएसएलमध्ये त्याला केवळ 10 ते 15 टक्केच रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड संतापले आहे. नुकतेच बांगलादेश सरकारने जाहीर केले आहे की, पुढील आदेशापर्यंत आयपीएलचे प्रक्षेपण बांगलादेशात प्रतिबंधित (Ban) राहील. मात्र, बीसीसीआय आणि आयपीएलला यामुळे कोणताही मोठा तोटा होणार नाही. त्यामुळे बांगलादेश सरकारने आयपीएल निलंबित केल्याने बीसीसीआयची चिंता वाढण्याची शक्यता कमीच आहे.






