भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. अशा कठीण काळात अनेक सेलेब्रिटी आणि सामाजिक संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत. मदत करणाऱ्यांमध्ये भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंचा देखील समावेश आहे. तसेच आता आयपीएल संघ देखील मदत करण्यास पुढे येत आहे. राजस्थान रॉयल्स संघाने सुरुवात केलेल्या या कार्याला आता आणखी एका आयपीएल संघाने हातभार लावला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ मदतीसाठी पुढे
दिल्ली कॅपिटल्स संघाने कोरोनाच्या लढ्यात मोलाचा हातभार लावला आहे. त्यांनी १.५ कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. या देणगीचा वापर वैद्यकीय पुरवठा, ऑक्सिजन सिलेंडर आणि कोविड किट खरेदी करण्यासाठी केला जाणार आहे. या संघाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “संघ आणि त्याचे संरक्षक जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि जीएमआर वरालक्ष्मी फाउंडेशनने दिल्ली स्थित हेमकुंट फाउंडेशन आणि उदय फाउंडेशनला स्वयंसेवी संस्था दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.”
तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बिष्ट म्हणाले की, “संकटकाळी दिल्ली कॅपिटल्स संघ दिल्लीतील नागरिकांसोबत आहे. ज्यांची कोरोना महामारीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची भावना प्रशंसनीय आहे. आम्हाला त्यांचा पाठिंबा द्यायचा अभिमान आहे.”
राजस्थान रॉयल्स संघानेही केली होती मदत
आयपीएलमधील सर्वात पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्सने गुरुवारी (२९ एप्रिल) कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी ७.५ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. ही माहिती राजस्थानने ट्विटरवरुन दिली होती.
त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते की कोविड-१९ मुळे प्रभावित झालेल्यांसाठी तातडीने मदत देण्यासाठी मालक, खेळाडू आणि व्यवस्थापनाकडून १ मिलियन डॉलर (भारतीय चलनानुसार ७.५ कोटी रुपये) दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत राजस्थान फाऊंडेशन आणि ब्रिटिश एशियन ट्रस्टद्वारे केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
छोटा पॅकेट बडा धमाका! मावीच्या एकाच षटकात सलग ६ चौकार कसे मारले? पृथ्वीने सांगितली ‘राज की बात’
‘जिथेही जातो तिथे आग लावतो,’ मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहितला वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा