न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहितने लवकरात लवकर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. असेही बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियात होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका ठरू शकते. यानंतर टीम इंडियाला टेस्टमध्ये नवा कर्णधार मिळू शकतो.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या संघात रोहित शर्मा कर्णधार आणि जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. अशा परिस्थितीत रोहितने कर्णधारपद सोडले तर साहजिकच बुमराह कर्णधारपदाचा दावेदार असेल. दरम्यान, हिटमॅननंतर रिषभ पंतकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात यावे. असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केले आहे. कैफ म्हणतो की, पंत नेहमीच संघाला सर्वोच्च ठेवतो. तसेच परदेशी परिस्थितीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
37 वर्षीय रोहित शर्मा करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे. न्यूझीलंडकडून भारताचा 0-3 असा पराभव झाल्यानंतर रोहितच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, मुंबईच्या फलंदाजाने पत्रकार परिषदेत फारशी चिंता दाखवली नाही. त्याने आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 वर आपले लक्ष केंद्रित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रोहितच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. त्याच्या अनुपस्थितीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल. मात्र, पंतला दीर्घकालीन नेतृत्वाची भूमिका द्यावी.अशी कैफची इच्छा आहे.
मोहम्मद कैफने त्याच्या इंस्टाग्राम लाइव्हवर सांगितले की, “सध्याच्या संघात फक्त रिषभ पंत हाच कसोटी कर्णधार होण्याचा दावेदार आहे. तो यासाठी पात्र आहे, तो जेव्हाही खेळला तेव्हा त्याने भारतीय संघाला पुढे ठेवले आहे. त्याने इंग्लंडसह, ऑस्ट्रेलिया असो वा दक्षिण आफ्रिका, सर्व परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रिषभ पंतने अर्धशतके झळकावली. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर इतर भारतीय फलंदाज झगडत असताना पंतने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. पुढे कैफ म्हणाला, “रिषभ पंत जेव्हा शेवटचा कसोटी सामना खेळेल, तेव्हा तो एक दिग्गज म्हणून निवृत्त होईल. त्याने हे आधीच सिद्ध केले आहे. त्याच्या यष्टिरक्षणात बरीच सुधारणा झाली आहे. जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत न्यूझीलंडला आराम मिळत नव्हता. त्यामुळे, मला वाटतं, जर तुम्ही सध्याच्या संघात भावी कर्णधार शोधत असाल तर, रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे.
हेही वाचा-
रिषभ पंत आणि आर अश्विनला विकत घेण्यासाठी सीएसके कोट्यवधी खर्च करायला तयार!
भारतीय संघाचे WTC फायनल खेळण्याचे स्वप्न भंगणार? अंतिम सामन्याचा मार्ग खडतर‘
न्यूझीलंड मालिकेचा निकाल आमच्यासाठी चांगला’, भारताच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन खेळाडू खूश