भारत आणि श्रीलंका (ind vs sl test series) यांच्यात मार्च महिन्यात मायदेशात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी शनिवारी (१९ फेब्रुवारी) बीसीसीआयने संघ घोषित केला. युवा क्रिकेटपटू सौरभ कुमार (sourabh kumar) ला या आगामी मालिकेत संघात निवडले गेले आहे. सध्या तो रणजी ट्रॉफीमध्ये (ranji trophy 2022) उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिथित्व करत आहे. स्पर्धेतील विदर्भासोबतच्या पहिल्या सामन्यात सौरभने उत्तर प्रदेशसाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची रणजी ट्रॉफी स्पर्धा नुकतीच सुरू झाली. विदर्भ आणि उत्तर प्रदेश यांच्यातील हा पहिला सामना अनिर्णीत राहिला. सौरभने उत्तर प्रदेशसाठी नाबाद ८१ धावा केल्या आणि सामना अनिर्णीत करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. या धावा त्याने १३९ चेंडूत केल्या, यामध्ये १२ चौकारांचाही समावेश आहे. रिंकू सिंहने त्याची शेवटपर्यंत साथ देत वैयक्तिक ६२ धावा केल्या. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. त्याव्यतिरिक्त प्रियम गर्गने देखील उत्तर प्रदेशसाठी अर्धशतक ठोकले.
फलंदाजीसोबतच सौरभने गोलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. त्याने टाकलेल्या ५० षटकांमध्ये १६० धावा खर्च केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या डावात उत्तर प्रदेशने ३०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात सहा विकेट्सच्या नुकसानावर ५४८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशने सहा विकेट्सच्या नुकसानावर २८० धावा केल्या आणि सामना अनिर्णीत राहिला.
दरम्यान, सौरभ आता लवकरच आपल्याला भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. तो क्रिकेटपटू बनण्यासाठी बागपतमधून दिल्लीमध्ये आला होता. त्याने २०१४ मध्ये त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला तो सर्विसेस संघासाठी खेळत होता. त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए डेब्यू सर्विसेस संघाकडून केले. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये गेला आणि तेव्हापासून उत्तर प्रदेश संघासाठी खेळू लागला. मागच्या मोठ्या काळापासून तो भारतीय संघाचा नेट गोलंदाज होता. आता मुख्य संघात त्याची निवड केली गेली आहे.
महत्वाच्या बातम्या –
मेगा लिलावात कोट्यावधी रुपये मिळाल्यानंतर ‘अशी’ होती मार्क वुडच्या पत्नीची प्रतिक्रिया
‘या’ दिवशी होणार आयपीएल २०२२ हंगामाला सुरुवात? महाराष्ट्रात साखळी सामने होण्याची शक्यता