आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी झाली. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) पराभव झाला. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला (केकेआर) 49 धावांनी पराभूत करून या हंगामातील पहिला विजय मिळविला.
कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे बरेच क्रिकेटपटू मागील काही महिन्यांपासून मैदानापासून दूर होते. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सहा महिन्यानंतर मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी उतरला. काल केकेआर विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 80 धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 5 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरच्या संघाला 146 धावाच काढता आल्या. कर्णधार रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, “मी पुल फटका खेळायचा चांगला सराव केला होता. माझे सर्व फटके चांगले होते. त्यामुळे माझा कोणता फटका सर्वोत्कृष्ट होता हे सांगू शकत नाही. मी सहा महिन्यांहून अधिक काळ क्रिकेट खेळलेलो नव्हतो आणि मला क्रिजवर थोडा वेळ घालवायचा होता. पहिल्या सामन्यात मी चांगला खेळलो नाही पण मला आज खेळून आनंद झाला.”
युएईमधील सहा सामन्यांमध्ये हा मुंबईचा पहिला विजय आहे. यापूर्वी 2014 मध्ये मुंबईने आपले पाचही सामने गमावले होते, तर या हंगामात पहिल्याच सामन्यात त्याचा चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला होता.
पुढे बोलतांना रोहित म्हणाला, “2014 मध्ये येथे पाच सामने गमावलेल्या संघातले सध्याच्या संघात फक्त दोन खेळाडू (प्रत्यक्षात तीन – रोहित, कायरान पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह) आहेत. आम्ही आज आमची रणनीती राबविण्यावर भर दिला. खेळपट्टी चांगली होती आणि मैदानात दव पडत होते. मी संघाच्या कामगिरीवर खूप खूष आहे”
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक पराभवाबदद्ल म्हणाला, “परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे नाही. माझ्या मते आमच्या फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात अशी काही क्षेत्रे आहेत ज्यात सुधार करणे आवश्यक आहेत. खरं सांगायचं तर, आज आम्ही लयीमध्ये नव्हतो. मला त्याचे जास्त विश्लेषण करायचे नाही. खेळाडूंना माहित आहे की ते कुठे अधिक चांगले करू शकतात. आमचे दोन खेळाडू पॅट कमिन्स आणि ओएन मॉर्गन यांनी आजच आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला होता. इथल्या उष्णतेत खेळणे आणि सोपे नाही.”