टी२० विश्वचषकात रविवारी(३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात महत्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लगला. विश्वचषकातील हा भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव असून संघ जवळपास उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. भारताने विश्वचषकात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले आहे, त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. अशात क्रिकेटजगतातील अनेक दिग्गजांनी कर्णधार विराट कोहली आणि संघावर निशाणा साधला आहे. आता या यादीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा नियमित सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि त्याच्या जागी ईशान किशनने डावाची सुरुवात केली, शोएब अख्तरने मात्र भारताच्या या रणनीतीवर टीका केली आहे. विश्वचषकात भारतीय संघाला संघर्ष करावा लागणार आहे, हे त्याला आधीच माहित असल्याचेही, शोएब अख्तर म्हणाला आहे.
शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. तो यावेळी म्हणाला की, “मला माहित नव्हते की, कोणत्या मानसिकतेसोबत भारतीय संघ खेळत होता. ईशान किशन सलामीला आणि रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला का आला ? हार्दिक पांड्याकडून गोलंदाजी करून घ्यायला एवढा उशीर का? मला माहीत नाही की, भारतीय संघ कोणत्या गेमप्लानसोबत खेळला. असे वाटत होते की, सर्वकाही विसरलेला भारतीय संघ मैदानावर खेळत होता.”
“स्पर्धेत अजून असे वाटलेच नाही की, भारतीय संघ खेळत आहे. भारताने एकदम सामान्य प्रदर्शन केले. भारतीय मीडियाने ज्याप्रकारचे वातावरण तयार करून दबाव तयार केला होता, त्यानंतर मला आधीच माहीत होते की, ते संघर्ष करणार आहेत. भारतीय संघाने पुन्हा सिद्ध केले की, त्यांच्याकडे कमजोर गोलंदाजी आक्रमण आहे,” असे शोएब पुढे म्हणाला.
भारता विश्वचषकातील त्यांच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही अडचणींचा सामना करावा लगू शकतो, असेही शोएब पुढे बोलताना म्हणाला.
तो म्हणाला की, “भारतीय संघासाठी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना दुर्दैव घेऊन येऊ शकतो. जर भारताला त्यांची इज्जत वाचवायची असेल, तर त्यांना कसल्याही परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवावा लागेल. जे मला आता समजत आहे की, जर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तर भारतीय संघ खूप अडचणीत पडेल. अबु धाबीमध्ये होणाऱ्या या सामन्यात चेंडू थोडा थांबून येतो आणि जर भारताने १५० ते १७० ची धावसंख्या केली, तरीही अफगाणिस्तान संघ त्यांना सोडणार नाही. भारतासाठी यावेळी गोष्टी खूप खराब वाटत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
लाजिरवाण्या पराभवासह बांगलादेश विश्वचषकातून ‘आऊट’; नॉर्किए-रबाडाची भेदक गोलंदाजी
चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’