आयपीएल २०२१ मध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स-सनरायझर्स हैदराबाद सामना झाल्यानंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सामन्यात मुंबईने ४२ धावांनी विजय मिळवला. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा कमी रनरेट असल्याने त्यांना गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहावे लागले आणि प्लेऑफची संधी हुकली.
आयपीएलच्या इतिहासात पाच जेतेपदे पटकावणाऱ्या मुंबईला हैदराबादविरुद्ध ४२ धावांनी विजय मिळवूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करता न येणे सोपे नव्हते. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह मुंबई संघात समाविष्ट असलेले इतर खेळाडू आता टी -२० विश्वचषकाची तयारी सुरू करतील.
मुंबई संघात असे सहा खेळाडू आहेत, जे टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचा भाग आहेत. या व्यतिरिक्त, आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या संघांतील भारतीय खेळाडू जे टी२० विश्वचषकाचा भाग असणार आहेत, ते आता दुबईमध्ये जमतील आणि टी -२० विश्वचषकाच्या तयारीसाठी सराव करतील.
मुंबई संघातील रोहित व्यतिरिक्त टी -२० विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंमध्ये सलामीवीर इशान किशन, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पंड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि लेगस्पिनर राहुल चाहर यांचा समावेश आहे. याशिवाय पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल आणि मोहम्मद शमी, सनरायझर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमारही आहे, जे आता टी -२० विश्वचषकाची तयारी सुरू करतील. या सर्व खेळाडूंचे संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत.
याशिवाय, ज्या संघांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, त्या संघातील भारतीय खेळाडू प्लेऑफचे सामने संपल्यानंतर टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघात सामील होतील.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आधीच दुबईला पोहोचले आहेत. त्यांच्याशिवाय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हेही दुबईला पोहोचले आहेत आणि सध्या त्यांचा विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. सर्व कोचिंग स्टाफ १३ ऑक्टोबरपासून कामकाज सुरू करतील.
भारतीय संघ टी२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. टी२० विश्वचषकानंतर शास्त्री प्रशिक्षकपदावरून पायउतार होतील. त्यांनी आपल्या कार्यकाळाची मुदत वाढवायची नाही, असे आधीच सांगितले आहे.
टी -२० विश्वचषकासाठी माजी यष्टीरक्षक कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले असून त्याच्या देखरेखीखाली विराट कोहलीची फौज मैदानात उतरेल. यावेळी भारतीय संघाला अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह गट -२ मध्ये स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानचा सामना केल्यानंतर भारतीय संघाला आपला पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळावा लागेल, तर ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी सामना करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘प्लीज रोहित भारत-पाक सामन्याची २ तिकीटं दे’, चालू सामन्यात चाहत्याची हिटमॅनकडे मागणी
शोएब मलिकचा टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान
टी२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच घडणार ‘या’ ५ गोष्टी