भारतीय संघानं तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. टीम इंडियानं गेल्या दशकभरापासून घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवलं होतं. परंतु न्यूझीलंडनं भारताचं हे वर्चस्व संपवलं. बीसीसीआयनं न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मजबूत संघ निवडला होता. परंतु भारतीय फलंदाजांनी किवी फिरकीपटूंसमोर गुडघे टेकले. आता भारताच्या या पराभवावर पाकिस्तानचा माजी फलंदाज अहमद शहजादनं बोचरी टीका केली आहे.
भारतानं गेल्या 12 वर्षात घरच्या मैदानावर सलग 18 मालिका जिंकल्या होत्या. पण हा सिलसिला शनिवारी संपला. अहमद शहजाद त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “न्यूझीलंडची टीम भारतात आली आणि त्यांनी भारतीय संघाची धुलाई करून टाकली. ते टीम इंडियाला लहान मुलासारखं मारून चालले गेले. त्यांनी भारताची खिल्ली उडवली आहे. लोक म्हणत आहेत की, हे कागदावरचे सिंह असून ते घरच्या मैदानावर हरले आहेत.”
शहजाद पुढे म्हणाला, “जेव्हा भारत 46 धावांवर ऑलआऊट झाला, तेव्हा रोहित म्हणाला होता की, प्रत्येकाचा एक वाईट दिवस असतो. आम्ही हे मान्य केलं. पण या सामन्यातही तुम्ही ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळलात, त्यावरून तुम्ही आत्मसंतुष्ट झाला आहात असं दिसतं. रोहित शर्मा म्हणतो की तो अनावश्यक बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तसं दिसलं नाही. हे दोन सामने अशा पद्धतीनं खेळले गेले, जणू काही शाळेतील मुलं खेळत आहेत.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं विजय मिळवला होता. त्यानंतर पुणे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीतही किवी संघ विजयी झाला. आता उभय संघांमध्ये 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
हेही वाचा –
पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची मोठी घोषणा
39 वर्षीय खेळाडूचा जलवा, बनला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू!
काय सांगता! 2024 मध्ये टीम इंडियानं एकही वनडे सामना जिंकला नाही, यापूर्वी फक्त एकदाच असं घडलं