लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्करामने धुमाकूळ घातला. त्याने 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शतक झळकावून ऑस्ट्रेलियासाठी गोंधळ उडवला आहे. तो 159 चेंडूत 11 चौकारांसह 102 धावा करुन नाबाद आहे. दक्षिण आफ्रिका 1998 नंतरचा पहिला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या मार्गावर आहे. मार्कराम पहिल्या डावात आपले खाते उघडू शकला नाही, परंतु दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम फलंदाजी करुन दाखवली आणि इतिहास रचला. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला आहे.
मार्करम हा आयसीसी फायनलमध्ये शतक झळकावणारा 15वा पुरुष क्रिकेटपटू आहे. इंग्लंडमध्ये एकाच कसोटीत शतक झळकावणारा आणि विकेट घेणारा तो पाचवा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला आहे. त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत. हेझलवूडने टाकलेल्या 55व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारून मार्करमने आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे. कसोटी सामन्यांमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने चौथ्या डावात तिसऱ्यांदा शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटीच्या चौथ्या डावात सलामीवीरांनी सर्वाधिक शतके
4 – सुनील गावस्कर
4 – ग्रॅमी स्मिथ
3 – हर्बर्ट सटक्लिफ
3 – जेफ्री बॉयकॉट
3 – गॉर्डन ग्रीनिज
3 – ग्रॅहम गूच
3 – एडन मार्करम
शुक्रवारच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन विकेटच्या मोबदल्यात 213 धावा करून आपले स्थान मजबूत केले. दक्षिण आफ्रिकेला 27 वर्षांत पहिले आयसीसी जेतेपद जिंकण्यासाठी आणखी 69 धावांची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे आठ विकेट शिल्लक आहेत. मार्कराने कर्णधार टेम्बा बावुमा (नाबाद 65) सोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 143 धावांची भागीदारी केली आहे. जर कांगारू संघ शनिवारी ही भागीदारी मोडू शकला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या सत्रातच विजयाची चव चाखू शकतो.






