इंडियन प्रीमियर लीग २०२१ आता समारोपाकडे वाटचाल करत आहे आणि आता टी२० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहेत. आयपीएलचा हा हंगाम काही खेळाडूंसाठी चांगला राहिला तर काहींसाठी निराशाजनक राहिला. आयपीएलमध्ये सहभाग घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडेन मार्करमने विश्वास व्यक्त केला आहे की, आयपीएल २०२१ मध्ये भाग घेतल्याने आगामी टी२० विश्वचषकातील दडपणाच्या परिस्थितीला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत होईल.
मार्करमने पंजाब किंग्जसाठी या लीगमध्ये सहा डाव खेळले होते, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४२ धावा अशी होती. तो सहसा दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला फलंदाजीला येत असतो, पण या आयपीएलमध्ये त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली. या अनुभवाचा येत्या टी२० विश्वचषकात फायदा होईल, अशी त्याला आशा आहे.
मार्करम म्हणाला, ‘हा एक अद्भुत अनुभव होता. परिस्थितीशी जुळवून घेणे आणि क्रिकेटच्या उच्च स्तरावर काहीतरी शिकण्याच्या बाबतीत आयपीएलचा मला फायदा झाला. आयपीएल सामन्यांनंतर मला टी२० क्रिकेटचे दिग्गज समजले जाणारे काही चांगल्या खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून चांगले मार्गदर्शन घेणे आणि आपल्या खेळात ते लागू करणे हे अविस्मरणीय होते.’
या दरम्यान त्याने शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्याच्या आपल्या अनुभवावर ही भाष्य केले, तो म्हणाला, ‘टी२० क्रिकेटमध्ये, विश्वचषक असो किंवा देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय मालिका सामन्याचा निकाल सहसा शेवटच्या तीन षटकांमध्येच येतो. अशा परिस्थितींचा अनुभव घेणे हे माझ्यासाठी चांगले होते. मला खात्री आहे की विश्वचषकातीलही सर्व सामने शेवटच्या षटकापर्यंत जातील. हे सगळं अशा वेळी दबावाला सामोरे जाण्याविषयी आहे, जेथे दोन ते तीन चेंडूंचा खेळ सामन्याचा निकाल बदलू शकतो.’
दरम्यान, बुधवारी (१३ ऑक्टोबर) कोलकाता नाईट राईड आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना खेळणारा दुसरा संघ कोण? याचा निकाल लागेल. चेन्नई सुपर किंग्स संघाने आधीच अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ
शेफाली वर्माने गमावले टी२० क्रमवारीतील अव्वल स्थान, ऑसी फलंदाजाने टाकले मागे
विराट कोहली आता आयपीएलही सोडू शकतो, ‘या’ माजी क्रिकेटरने मत व्यक्त करताना कारणही केले स्पष्ट